#GreenPune त्यांच्या प्रयत्नातून पर्वतीवर बहरली हिरवळ (व्हिडिओ)

#GreenPune त्यांच्या प्रयत्नातून पर्वतीवर बहरली हिरवळ (व्हिडिओ)

पुणे  - पर्वती हे पुणेकरांच्या आकर्षणाचे ठिकाण असले, तरी हिरवळीअभावी ही टेकडी उजाड झाली आहे. मात्र, पर्वतीवर हिरवळ आणायची, हे आव्हान पर्वतीप्रेमींनी स्वीकारले आणि ते प्रत्यक्षात आणले. वृक्षारोपण केल्यानंतर न चुकता नित्यनियमाने पाणी देणे, खत टाकणे, शेळ्या झाडांचा पाला खाऊ नयेत म्हणून जाळ्या लावण्याचे काम ते करीत आहेत. त्यांच्या पाच वर्षांच्या प्रयत्नातून या ठिकाणी २०० झाडे मोठी होत आहेत.

 पर्वतीवर चढताना एका बाजूला दाट झाडी दिसते, तर जनता वसाहतीच्या बाजूने टेकडीवर एखाद्‌दुसरे झाड आहे. काही वर्षांपूर्वी येथे प्रचंड घाण, मद्याच्या फुटलेल्या बाटल्या पडलेल्या असत. ही स्थिती बदलली पाहिजे, असे काही जणांना वाटले. ‘पर्वती हरितक्रांती संस्थे’च्या माध्यमातून रवींद्र कुलकर्णी, दिवाकर हेगडे, रवी कुलकर्णी, प्रमोद गोडबोले, सचिन देवळेकर, अमीर मुजावर, प्रल्हाद शिंदे यांच्यासह आणखी काही जणांनी काम सुरू केले.

 या ठिकाणी २०१४ च्या पावसाळ्यात कडुनिंब, वड, पिंपळ, जांभूळ या झाडांची रोपटी लावण्यात आली. पण, काही उपद्रवींनी रोपे तोडली, शेळ्यांनी पाने खाल्ली. त्या वेळी पर्वतीवर येणारे-जाणारे लोक त्यांच्याकडे बघून हसत. इतक्‍या वर्षात येथे झाड आले नाही, आता तुम्ही प्रयत्न करून कसे येईल, असे ते म्हणत. तरीही, पर्वतीवर हिरवळ निर्माण करण्याचा ध्यास यांनी सोडला नाही.

 स्वखर्चातून रोपटे आणून लावले, पर्वतीवरील विहिरीतून पाणी आणून ते घालून प्रत्येक रोपट्याला वाढविले. पर्वती हरितक्रांती संस्थेकडून सतत सुरू असलेल्या या प्रयत्नांमुळे काही जण मदतीला आले. यात काही तरुणांचाही समावेश आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने विहिरीवर मोटार बसवून दिल्याने पाइपने पाणी घालण्याची व्यवस्था झाली. सध्या पर्वतीच्या या टेकडीवर कडुनिंब, पिंपळ, गुलमोहर, कांचन, बकुळी, जांभूळ, वड, उंबर अशी सावली देणारी झाडे लावली आहेत. 

रवींद्र कुलकर्णी म्हणाले, ‘‘पर्वतीच्या कातळावर आम्ही वृक्षारोपण करीत असल्याचे पाहून लोक हसायचे. पण, आम्ही हे आव्हान स्वीकारले. स्वखर्चातून रोपे विकत आणली. पूर्वी डब्याने पाणी घालायचो. आता पाइप लावून झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. परिसरातील नागरिकांचेही सहकार्य मिळत असल्याने येत्या काही वर्षांत पुणेकरांना पर्वती हिरवीगार दिसेल.’’ 

पर्वतीवर पावसाळ्यात नवीन रोपटी लावली जातात. पाणी घालणे, खत टाकणे यापेक्षा रोपट्यांची सुरक्षा, हे येथे अवघड काम आहे, असे गोडबोले यांनी सांगितले.

पेशवेकालीन विहिरीची डागडुजी आवश्‍यक 
पर्वतीवर पेशवेकालीन विहीर आहे. पर्वतीच्या बांधकामासाठी याच विहिरीतील पाणी वापरले, असा उल्लेखही आहे. पण, आता ही विहीर धोकादायक झाली असून, गाळही मोठ्या प्रमाणात आहे. विहिरीची दुरुस्ती होणे गरजेचे आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com