अवयवदानाने सहा जणांना जीवदान

सुनील शेडगे
शनिवार, 26 मे 2018

नागठाणे - तरुण, कर्तृत्वसंपन्न मुलाचा मृत्यू म्हणजे डोंगराएवढे दुःख. मात्र, परिस्थितीला सामोरे जात घोरपडे कुटुंबीयांनी रोशनच्या अवयवदानाचा निर्णय घेतला अन्‌ त्यातून सहा जणांची आयुष्ये उभी राहिली.

नागठाणे - तरुण, कर्तृत्वसंपन्न मुलाचा मृत्यू म्हणजे डोंगराएवढे दुःख. मात्र, परिस्थितीला सामोरे जात घोरपडे कुटुंबीयांनी रोशनच्या अवयवदानाचा निर्णय घेतला अन्‌ त्यातून सहा जणांची आयुष्ये उभी राहिली.

घोरपडे कुटुंब मत्त्यापूर (ता. सातारा) येथील. त्यातील रोशन या १९ वर्षांच्या हरहुन्नरी तरुणाचे नुकतेच अपघाती निधन झाले. तो तबला, पखवाज वादनासह मल्लखांबात प्रवीण होता. सैनिक बनून देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, त्याच्या अकल्पित जाण्याने होत्याचे नव्हते झाले. रोशनचा मृत्यू म्हणजे घोरपडे कुटुंबीयांवर मोठा आघात होता. मात्र, दु:खाचा डोंगर बाजूला सारत त्यांनी अवयवदान करण्याचे ठरविले. डॉ. सोमनाथ साबळे, डॉ. नीलेश साबळे, डॉ. साठे यांनी अवयव प्रत्यारोपणाचे महत्त्व विषद केले. रोशनचे आजोबा पांडुरंग घोरपडे हे वारकरी संप्रदायातील. त्यांनी या कल्पनेला दुजोरा दिला.

आई वंदना, वडील सुनील तसेच अन्य सदस्यांनीही यास मान्यता दिली. त्यानंतर रोशनच्या अवयवांचे पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दान करण्यात आले. त्यातून सहा जणांना जीवनदान मिळाले. याकामी साताऱ्यातील ‘कोमल न्यू लाइफ फाउंडेशन’ने महत्त्वाची भूमिका बजावली.

रोशनचे अस्तित्व कायमचे
अवयवदानाच्या माध्यमातून रोशनचे अस्तित्व कायम राहील. तो जरी आज आमच्यात नसला, तरी त्याच्यामुळे सहा जणांच्या आयुष्याला गती लाभली, हे आमच्यासाठी मोलाचे आहे, अशी प्रतिक्रिया आजोबा पांडुरंग घोरपडे यांनी व्यक्त केली.

Web Title: 6 people life saving by organ donate ghorpade family