धरणग्रस्त कुटुंबाने माळरानात फुलवली आमराई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

मराठवाडी प्रकल्पातील हणमंत रेठरेकरांसह कुटुंबीयांच्या कष्टाला यश
ढेबेवाडी - पुनर्वसित ओसाड माळरान व मुरमाड शेतजमिनीवर कष्टातून हापूसची आमराई फुलविण्याची किमया मराठवाडी प्रकल्पातील धरणग्रस्त कुटुंबाने केली आहे. हणमंत रेठरेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यासाठी काबाडकष्ट घेतले आहेत. सुमारे १९ वर्षांपूर्वी धरणाच्या पायालगतच्या रेठरेकरवाडीतून ते वांग रेठरे (ता. कडेगाव) येथे स्थलांतरित झाले आहेत. 

मराठवाडी प्रकल्पातील हणमंत रेठरेकरांसह कुटुंबीयांच्या कष्टाला यश
ढेबेवाडी - पुनर्वसित ओसाड माळरान व मुरमाड शेतजमिनीवर कष्टातून हापूसची आमराई फुलविण्याची किमया मराठवाडी प्रकल्पातील धरणग्रस्त कुटुंबाने केली आहे. हणमंत रेठरेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यासाठी काबाडकष्ट घेतले आहेत. सुमारे १९ वर्षांपूर्वी धरणाच्या पायालगतच्या रेठरेकरवाडीतून ते वांग रेठरे (ता. कडेगाव) येथे स्थलांतरित झाले आहेत. 

धरणाच्या पायालगतच्या रेठरेकरवाडी १९९८ मध्ये कडेगाव तालुक्‍यातील शाळगावजवळच्या वांग रेठरे गावठाणात स्थलांतरित झाली. त्यात हणमंत रेठरेकर यांचे कुटुंबही होते. माध्यमिक शिक्षक असलेल्या रेठरेकरांना गावठाणापासून सुमारे दोन किलोमीटरवर दोन एकर मुरमाड जमीन मिळाली. माळावरील जमिनीत पिकणार तरी काय, असा प्रश्‍न सुरवातीला अन्य धरणग्रस्तांप्रमाणेच त्यांनाही पडला होता. मात्र, त्याचा विचार न करता ते तेथे झपाटल्यासारखे कामाला लागले. दोन एकरांत ठराविक अंतरावर जेसीबीने खड्डे खोदून त्यात कोकणातून आणलेल्या केशर, रत्ना, तोतापुरी, हापूस, पायरी आंब्यांच्या रोपांची लागवड केली. पाण्याचा बिकट प्रश्‍न असल्याने सुरवातीला काही वर्षे टॅंकरने पाणी विकत घेतले.

उन्हाळ्यात तेही पुरत नसल्याने प्लॅस्टिकची कॅन छिद्रे पाडून रोपांच्या बुंध्याजवळ पुरली. पाणी, खते, औषधांचे योग्य नियोजन केले. त्यामुळे आमराई बहरत गेली. उत्पादनालाही सुरवात झाली. २०१२ मध्ये श्री. रेठरेकर निवृत्त झाल्याने आमराईसाठी पूर्णवेळ देणे शक्‍य झाले. सध्या तिथे आंब्यांची १७५ झाडे आहेत. त्याशिवाय चिक्कू, लिंबू, साग, सीताफळ, रामफळ, करवंद, नारळ, गुलाब आदी फळे आणि फुलझाडेही आहेत.

पाण्यासाठी दोन कूपनलिका खोदल्या आहेत. त्या परिसरात कालव्याचेही पाणी उपलब्ध आहे. 

बहरलेल्या बागेत हणमंत रेठरेकर यांच्यासह त्यांची पत्नी सौ. कमल, मुलगा मंगेश आणि कन्या जीविता, ज्योती यांचे मोठे कष्ट आहे. बागेतून वर्षाकाठी भरघोस उत्पन्न मिळत आहे. कडधान्य आणि भुईमुगाचे आंतरपीकही ते घेतात. पिकवून नव्हे तर ग्राहकांना प्रत्यक्ष आमराईत नेऊन पाडाचे हापूस झाडावरून काढून देण्याची वेगळी पध्दतही त्यांनी अवलंबलेली आहे. पूर्वी काही दिवस आमराईच्या देखभालीसाठी फार्महाउस उभारले आहे. लवकरच तेथे कृषी पर्यटन सुरू करण्याचाही त्यांचा विचार आहे. 

निर्जन माळरानावर हिरव्या वैभवामागे कुटुंबातील प्रत्येकाचे कष्ट आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आमराईत राबतोय. अधिकारी बनायचे स्वप्न आहे. 
- मंगेश रेठरेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aamrai develop by dam affected family