जिल्हा मध्यवर्ती बॅंक होती म्हणून! 

(शब्‍दांकन - अजित झळके)
शनिवार, 7 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

राष्ट्रीयीकृत बॅंकांवरील विश्‍वास जेथे कच खातो, तेथे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसारख्या सहकारी संस्था ग्रामीण भागात उद्योजकांना बळ देतात. ओझर्डे (ता. वाळवा) येथील दिनकर पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सहकार्याने वारंवार संकटातून मार्ग काढत आदिती फूड्‌स कंपनी उभी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विचाराने भारावलेल्या दिनकर पाटील यांनी शेतीमाल प्रक्रिया उद्योगात उडी घेतली. ना अनुभव, ना पैशांचे पाठबळ. ‘आदिती फूड्‌स’ हा फळप्रक्रिया उद्योग नेर्लेत उभारला. जिल्हा बॅंकेने हात दिला. दोन कोटींचे कर्ज घेतले. सन १९९४ मध्ये कंपनीने लिंबूवर प्रक्रिया सुरू केली. बाजारपेठेसाठी धडपड करावी लागली. अडचणी आल्या, गणित चुकले. चार वर्षांत ४ कोटींचा तोटा झाला. कर्ज थकलं. दिनकर हतबल झाले. जिल्हा बॅंकेने पुन्हा कर्ज दिले. १९९८ ला आंब्यावर प्रक्रिया सुरू झाली. २ कोटीचं नवीन कर्ज घेतलं. नवी यंत्रसामग्री आणली. गावोगावी स्टॉल लावले. इराक, इराण दौऱ्याने जागतिक बाजारपेठ मिळाली; मात्र तेथे युद्धामुळे उद्योग अडचणीत आला. मॅंगो पल्पची ऑर्डर परत आल्याने ४ कोटींचा फटका बसला. उद्योग आणि पाटील दोन्ही बुडणार  अशीच स्थिती होती.

पुन्हा जिल्हा मध्यवर्ती बॅंक. १२ कोटींचे नवीन कर्ज. बहुतांश कर्जे थकली. थकबाकी ४० कोटींची झाली. २००६ ला बॅंकेने सिक्‍युरिटायझेशन ॲक्‍टखाली कंपनी ताब्यात घेतली. ती विकायला काढली. खरेदीदार  मिळाला नाही. बॅंकेने काही अटी-शर्तीवर कंपनी पुन्हा ताब्यात दिली. १ कोटी रुपये भरून घेतले. एक वर्षाचा कालावधी गेला. पुन्हा २००८ ला बॅंकेने कर्ज दिले. मुलगा भगतसिंह एमबीए करून कंपनीत दाखल झाला. परदेशात मार्केट शोधलं. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका बाजार विस्तारला. ‘आदिती’ला झळाली आली. मॅंगो पल्प, जाम, ट्रटू फ्रुटी, टोमॅटो केचअप,  चायनीज स्वॉस, स्वीट कॉर्न, पपई पल्प, मका, टोमॅटो प्युरी, मॅंगो कॅन्डी यासह ६५ उत्पादने जगभर पोहोचली. २०१३ ला दुसरा मुलगा पृथ्वीराज व्यवसायात आला. जिल्हा बॅंकेने दाखवलेला विश्‍वास व पाटील कुटुंबाची चिकाटी यामुळे सारे उत्तम झाले. आता येथे ६०० कामगारांचे कुटुंब चालत आहे.

Web Title: aditi foods company