कोल्हापुरात मृत्यूनंतर प्रथमच त्वचादान

कोल्हापुरात मृत्यूनंतर प्रथमच त्वचादान

कोल्हापूर - आईच्या मृत्यूनंतर तिच्या त्वचेचा इतर गरजू रुग्णांना उपयोग व्हावा, म्हणून भूमकर कुटुंबीयांनी मंदाकिनी सुरेश भूमकर (वय ८३) यांच्या त्वचेचे दान दिले. मृत्यूनंतर अवयवदान, देहदान, नेत्रदान जरूर केले जाते; पण कोल्हापुरात मृत्यूनंतर प्रथमच त्वचादान केले गेले. मंदाकिनी भूमकर यांच्या मृत्यूनंतर सहा तासांत डॉक्‍टरांच्या खास टीमने त्यांच्या घरी येऊनच त्वचा काढून घेतली. आता ही त्वचा सहा वर्षे त्वचारोपणासाठी उपयोगी पडणार आहे. 

भूमकर परिवार कोल्हापुरातील वकिली व चार्टर्ड अकौंटंट व्यवसायातील वेगळा ठसा उमटवणारा परिवार. कोल्हापूरशी त्यांची खूप वर्षांपासूनची सामाजिक बांधिलकी. त्यामुळं मंदाकिनी यांचे निधन झाल्यानंतर मुलगा किशोर व स्नुषा भारती यांनी तातडीने त्वचादानाचा निर्णय घेतला. मृतदेहावरील त्वचा काढण्याच्या या निर्णयामुळेच नक्कीच शंका-कुशंका विचारण्यात येऊ लागल्या.

त्वचा काढल्याने ती विद्रुप दिसेल, अशीच सर्वांची समजूत होती. पण, बेळगावहून केएलई हॉस्पिटलची डॉ. राजेश पवार, डॉ. सागर काटकर, दीपक सदानंद व शिल्पा कर्णिक यांची टीम तासाभरात दाखल झाली. त्यांनी घरातील एका खोलीतच पाठ व कमरेपासूनच्या खालच्या भागावरील त्वचा कुटुंबातील एका व्यक्तीसमोरच हळूवारपणे काढली. ती खास बरण्यांत ठेवली. त्वचा काढलेल्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित बॅंडेज केले व मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. 

काढून घेतलेली त्वचा ही किमान पाच ते सहा वर्षे प्रिझर्व्ह केली जाते. विशेषतः भाजून जखमी झालेल्या रुग्णांना ही त्वचा लावली जाते. यामुळे रुग्ण लवकर बरा तर होतोच पण भाजल्यामुळे त्वचेवर येणारे व्यंगही टाळू शकतो. त्या त्या रुग्णाच्या गरजेनुसार तेवढीच त्वचा त्याला लावली जाते. मृत झालेल्या एखाद्या व्यक्तीची त्वचा अनेक रुग्णांना उपयोगी पडू शकते. भूमकर परिवाराने या त्वचा दानासाठी धीरोदत्तपणा दाखवला. त्वचा काढल्यानंतर शरीर रक्तबंबाळ होते. विद्रुप होते असल्या ऐकीव माहितीवर विश्‍वास न ठेवता आईचा मृतदेह त्यावरील त्वचा काढून घेण्यासाठी परोपकारी भावनेने डॉक्‍टरांच्या पथकाकडे सुपूर्द केला. 

िस्कन बॅंक सुविधा
दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेने केएलई रोटरी िस्कन बॅंकेच्या सहकार्याने ही त्वचा शस्त्रक्रिया केली. कोल्हापुरात िस्कन (त्वचा) बॅंकेची सुविधा नसल्याने बेळगावहून कोल्हापुरात येऊन त्वचादान झाले. पुरुषोत्तम पवार हे या िस्कन बॅंक चळवळीत क्रियाशील आहेत.

त्वचादान अनेक रुग्णांसाठी उपयोगी ठरते. ज्या रुग्णाला जेवढ्या त्वचेची गरज तेवढीच लावली जाते. त्यामुळे एका मृतदेहाची त्वचा अनेक रुग्णांसाठी वापरता येते. कोल्हापुरात 
िस्कन बॅंकेची सोय झाली तर नक्कीच आमच्यासारखे अनेकजण पुढे येतील.
- भारती भूमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com