पुण्यातून कन्याकुमारी सायकलने गाठणारा "इडियट' 

akshay warkhade
akshay warkhade

पुणे - कधी धो- धो पाऊस; तर कधी अंगाची लाही करणारे ऊन, अशा प्रतिकूल परिस्थितीत सायकलने घाट, किनारी रस्ते, घनदाट जंगलातून दिवस- रात्र एकट्याने प्रवास करत "त्याने' हा सतरा दिवसांत एकूण 1650 किलोमीटरचा प्रवास केला. 

पुण्याच्या अक्षय वारघडे याने नुकताच हा पुणे ते कन्याकुमारी प्रवास पूर्ण केला आहे. तो सध्या 21 वर्षांचा असून, वाघोली येथील ए. आय. एस. एस. एम. एस. सी. ओ. डी. महाविद्यालयात मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. 

या प्रवासाबद्दल अक्षय म्हणाला, ""या प्रवासाची सुरवात मी पुण्यातून लाल महालापासून केली. प्रवासादरम्यान सुरवातीचे दोन दिवस चांगले गेले. मात्र गोव्यामध्ये पोचल्यावर प्रवासातील कठीण टप्पा जाणवू लागला. तेथील उष्ण वातावरण आणि घसरडे रस्ते यामुळे सायकल चालवायला त्रास होत असे. परंतु प्रवास सुरूच ठेवला. कोचीमध्ये प्रवास करत असताना मुसळधार पाऊस चालू होता. रस्त्यांचा अंदाज नसल्यामुळे एका ठिकाणी खड्ड्यात पडलो. पायाला दुखापत झाली होती. परंतु रस्त्यावर आसपास कोणीही नव्हते. तसाच उठलो आणि सायकल चालवून मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. तळपायाचे सालटे निघाले होते. त्यावर स्वत:च मलमपट्टी केली.'' 

""प्रवासातला सर्वांत अवघड टप्पा होता आपुलझा शहर ते स्वामी विवेकानंद स्मारक यादरम्यानचा. कोठेही मुक्काम न करता हा 260 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा क्षण होता. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे ही इच्छा पूर्ण होईल, अशी अपेक्षा नव्हती. "इच्छा तेथे मार्ग' या प्रमाणे मलाही मार्ग सुचला, तो सायकलद्वारे भारतभ्रमण करायचा. त्यासाठीही पैसे आणि काही वस्तू लागणार होत्या. त्या जमविण्याचा प्रयत्न चालू झाला. यासाठी अनेकांनी मला मदत केली. अगदी सायकल आणि प्रवासासाठी लागणारी अन्य साहित्य, पैसेदेखील इतरांकडून घेतले होते,'' असेही त्याने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com