एकेकाळचे मद्यपी सोडवतात मद्यपींची दारू!

Alcoholic
Alcoholic

सातारा - एकेकाळचे मद्यपी सोडवतात मद्यपींची दारू, असे कोणी सांगितले तर कदाचित कोणाचा विश्‍वास बसणार नाही. मद्यपीच्या कुटुंबीयांचा तर नाहीच नाही. पण, हे खरे आहे. ही किमया साधली आहे... आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या अल्कोहोलिक्‍स ॲनॉनिमस या स्वयंसेवी संस्थेच्या येथील ‘नवजीवन समूहा’ने.

शहरी असो वा ग्रामीण भागातील, गरीब असो वा अतिश्रीमंत, साध्या घरात, झोपडपट्टीत राहणारा असो किंवा अगदी मोठमोठे बंगले, फ्लॅटमध्ये राहणारा, उच्च पदावरील अधिकारी, उद्योजक, व्यापारी असो किंवा अगदी कनिष्ठ पदावरील कर्मचारी, सामान्य व्यक्ती, मजूर या सर्वांत एक गोष्ट ‘कॉमन’
असते, ती म्हणजे मद्यसेवन. फुटकळ हातभट्टी, देशी दारूपासून उच्च दर्जाची इंग्लिश दारू, वाईनपर्यंतचे व्यसन ही बाब सर्वांमध्ये कमी-अधिक प्रमाणात आढळून येते. कोणतेही व्यसन हे प्रकृतीच्या दृष्टीने वाईटच असते. परंतु, काही शिक्षित, उच्चभ्रू लोक ते मर्यादित घेतले तर औषध असते, असे म्हणून सेवन करत असतात.

अतिमद्यपानामुळे कित्येक हसतीखेळती कुटुंबे अक्षरशः उद्‌ध्वस्त झालेली आपल्याला पावलोपावली पाहायला मिळतात. त्यामुळे त्या कुटुंबातील प्रामुख्याने पत्नी, लहान-मोठ्या मुला- मुलींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. वृद्धापकाळात आई-वडिलांचे हाल झालेले पाहावयास मिळतात. व्यवसाय, नोकरी, व्यापार आदी क्षेत्रांत उंच भरारी घेत यशोशिखरावर पोचलेले अनेक लोक अगदी रसातळाला गेलेले पाहावयास मिळतात. यावर आता एककेळी मद्यपाशात बुडालेल्या मद्यपींनीच स्वअनुभवातून मद्यपानाच्या अतिआहारी गेलेल्या मद्यपींची दारू सोडवण्याचे व्रत कर्तव्य म्हणून हाती घेतले आहे. 

मद्यपान हे नेमके कसे वाईट आहे, त्यामधून  प्रकृती, कुटुंब कसे उद्‌ध्वस्त होते, व्यवसाय, नोकरी कशी अडचणीत येते, समाजात आपली पत कशी रसातळाला जाते, पावलोपावली आपल्याला अपमानीत कसे व्हावे लागते, हे स्वअनुभवातून सांगण्यासाठी म्हणून लक्ष्मीकांत एल यांनी १९९७ मध्ये येथे अल्कोहोलिक्‍स ॲनॉनिमस या स्वयंसेवी संस्थेचा ‘नवजीवन समूह’ स्थापन केला. या समूहाला हळूहळू एकेकाळी मद्याच्या आहारी गेलेल्या; परंतु त्यातून बाहेर पडलेल्या मित्रांची मदत मिळत गेली आणि या कामाने हळूहळू वेग घेतला आहे. या सर्वांनी मद्यपींना मद्यपाशातून मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. समूहातील सदस्य हे समुपदेशन करत नाहीत तर मद्यपींना आपल्या जुन्या अनुभवांची देवाण- घेवाण करतात. आपण पूर्वी किती आणि कसे मद्यपान करत होतो, त्यातून काय नुकसान झाले, त्यातून बाहेर कसे पडलो, मद्यपाशातून बाहेर पडल्यावर आजची स्थिती व पूर्वीची स्थिती कशी होती, अशा विचारांची देवाण-घेवाण करण्यात येते. एखादा मद्यपीच दुसऱ्या मद्यपीची भावना योग्यरित्या समजून घेऊन त्याला स्वअनुभवातून व्यसनमुक्त करू शकतो, हे प्रत्ययास येत आहे. यासाठी कसलेही शुल्क आकारले जात नाही. सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम केले जाते.

दारू पिऊन आले तरी चालते!
स्वअनुभवच मद्यपानाच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी प्रभावशाली ठरतो. सभेला येणाऱ्यांनी स्वतःची ओळख सांगावी, दारू पिऊन येऊ नये, असे कसलेही बंधन नाही. दारू पिऊन आलेल्यांना हाकलून दिले जात नाही. उलट येथे येणाऱ्या सर्वांची नावे, हुद्दा, आडनाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाते. ‘आम्ही सारे मद्यपी आहोत आणि मद्यपानाच्या आजाराने ग्रासलेलो रुग्ण आहोत,’ ही भावना निर्माण करून मद्यपानापासून एकमेकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला यशही चांगले येत आहे.

...येथे भरते नियमित सभा
  अल्कोहोलिक्‍स ॲनॉनिमस अर्थात नवजीवन समूह 
  दररोज सभा - वेळ सायंकाळी ७.३० ते ८.३०
  स्थळ - लस्सी दुकानाशेजारी, शारदा विद्यामंदिर, 
  नगरपालिका शाळा क्रमांक ३, राजवाडा, सातारा
  प्रवेश - सर्वांना विनामूल्य.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com