अंगणवाडी मदतनीसचा मुलगा होणार लेफ्टनंट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

पुणे : अंगणवाडी मदतनीसचा मुलगा भारत दरबारसिंह जाधव याची भारतीय सेनादलाच्या "शॉर्ट सर्व्हिस कमिशन'साठी निवड झाली आहे. चेन्नईच्या "ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी'मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तो "लेफ्टनंट'पदी कार्यरत होईल. 

पुणे : अंगणवाडी मदतनीसचा मुलगा भारत दरबारसिंह जाधव याची भारतीय सेनादलाच्या "शॉर्ट सर्व्हिस कमिशन'साठी निवड झाली आहे. चेन्नईच्या "ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी'मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तो "लेफ्टनंट'पदी कार्यरत होईल. 

भारत हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील सुटाळा बुद्रुक गावातील असून, त्याची आई गावातच अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करते. वयाच्या अकराव्या वर्षी त्याचे पितृछत्र हरपले. त्यानंतरही त्याच्या आईने मुलांना उच्चशिक्षण देण्याचा निर्धार करून तो पूर्ण केला. भारतची थोरली विवाहित बहीण भारती अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात "स्टाफ नर्स' म्हणून कार्यरत असून धाकटी बहीण आरती पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे; तसेच भाऊ पंकज सेनादलात जवान आहे. 

भारतचे शालेय शिक्षण शेगावच्या जवाहर नवोदय विद्यालयात झाले. त्यानंतर त्याने श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलीकम्युनिकेशनमध्ये 2014मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर तो नोकरीसाठी पुण्यात आला. हिंजवडीमधील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये तो अभियंता म्हणून गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहे. याच काळात त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. आयोगाने फेब्रुवारी 2016 मध्ये घेतलेल्या सीडीएस परीक्षेत तो पात्र ठरला. त्यानंतर मुलाखत व वैद्यकीय परीक्षेतदेखील तो पात्र ठरला होता. मागील आठवड्यात लोकसेवा आयोगाने 153 यशस्वी उमेदवारांची यादी जाहीर केले. यात भारत हा देशातील गुणवत्ता यादीत 108व्या क्रमांकावर आहे. येत्या तीन एप्रिलला तो 49 आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी चेन्नईमधील संस्थेत रुजू होईल. 

लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर म्हणाले, ""भारत हा ध्येयवादी तरुण असून, त्यामध्ये परिश्रम करण्याची तयारी आहे. चेन्नईतील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर त्याला भारतीय सैन्यदलात "लेफ्टनंट' हे पद भूषविता येईल.'' 

लहानपणापासून सैन्यदलात जाण्याची माझी इच्छा होती. सीडीएस परीक्षा पास झाल्याने ती आता पूर्ण झाली आहे. घरातील जबाबदारी माझ्यावर असल्याने शिक्षण झाल्यावर नोकरी करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे मी पुण्यात आलो; परंतु मला येथे सैन्यदलात जाण्यासाठी योग्य दिशा मिळाली. 
-भारत जाधव 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anganvadi teachers song Officer