शाळा सोडून शेळ्या वळणारा तरुण बनला सैनिक

बाळासाहेब लोणे
सोमवार, 2 जुलै 2018

गंगापूर - शिक्षणापासून भटकटलेला, शाळा सोडून शेळ्या चारणारा तरुण शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आला. सध्या तो सैनिक बनून राजस्थानच्या सीमेवर देशसेवा करीत आहे. शरीफपूरवाडी (ता. गंगापूर) येथील नानासाहेब रघुनाथ फटांगडे असे या जिद्दी, मेहनती तरुणाचे नाव आहे. 

गंगापूर - शिक्षणापासून भटकटलेला, शाळा सोडून शेळ्या चारणारा तरुण शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आला. सध्या तो सैनिक बनून राजस्थानच्या सीमेवर देशसेवा करीत आहे. शरीफपूरवाडी (ता. गंगापूर) येथील नानासाहेब रघुनाथ फटांगडे असे या जिद्दी, मेहनती तरुणाचे नाव आहे. 

कनकोरी (ता. गंगापूर) येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतच शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी तालुक्‍याच्या गावी जावे लागत असे. नानासाहेबने वर्ष १९९२ मध्ये चौथी झाल्यावर गंगापूरच्या जिल्हा परिषद शाळेत पाचवीत प्रवेश घेतला. त्याचे आई-वडील व चौघे भाऊ घरची थोडीफार शेती कसून, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचे. घरी दहा-पंधरा शेळ्या होत्या. वडील ते बघायचे. अभ्यासात फारशी गती नसल्याने नानासाहेबला शाळेत नेहमी शिक्षा व्हायची. एकदा वडिलांना बाहेरगावी जायचे असल्याने तीन दिवसांसाठी नानासाहेबवर शेळ्या चारण्याची जबाबदारी पडली. वडील परतल्यावर नानासाहेबने ‘गंगापूरला शाळेत चला व माझी शाळा का बुडाली हे गुरुजींना सांगा,’ अशी विनंती वडिलांना केली. त्या वेळी वडील कुठल्या तरी कारणाने वैतागलेले होते. त्या भरातच ते ‘तुला जायचे तर जा शाळेत, नाहीतर शेळ्या वळ’ असे म्हणाले. तेवढेच निमित्त झाले आणि शिक्षकांच्या भीतीपोटी नानासाहेबची शाळा सुटली. शेळ्या चारणे व आसपासच्या गावांतील जत्रेत कुस्ती खेळून आखाडे जिंकणे असा त्याचा नित्यक्रम सुरू झाला. 

शिक्षणात गती नसली तरी कुस्तीमध्ये नानासाहेबला रस होता. व्यायाम करून त्याने बलदंड शरीर बनविले होते. दरम्यान, माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांच्या संस्थेला कनकोरीत आठवी ते दहावीच्या वर्गाला मान्यता मिळाली. गावातील मुलांसोबत नानासाहेबलाही परत शाळेत जाण्याची ओढ लागली. वडिलांच्या परवानगीने आठवड्यातून एक दिवस मुलांसोबत शाळेत जायचे, शाळा भरण्याआधी प्रांगणात खेळायचे, शाळा भरली की बाहेर लिंबाच्या झाडाखाली मुलांची वाट बघत बसायचे, असा प्रकार सुरू झाला. मुख्याध्यापक धोंडिराम पवार, शिक्षक नारायण मोहरे यांची त्याच्यावर नजर पडली. चांगली शरीरयष्टी असलेला हा मुलगा मुलींची छेड काढण्यासाठी तर शाळेच्या बाहेर थांबत नसेल ना, अशी शंका त्यांना आली.

तू कोण? इथे काय करतो? अशी चौकशी केल्यावर नानासाहेबने मला शिकण्याची आवड असल्याचे सांगितले. बलदंड शरीर असल्याने कोणाशी भांडण करणार नाही, या अटीवर शिक्षकांनी त्याला १९९६ मध्ये थेट आठवीत प्रवेश दिला. 

नानासाहेबचा आनंद गगनात मावेनासा झाला. १९९८ मध्ये तो दहावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर गंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालयातून २००० मध्ये तो बारावी झाला. त्याच वर्षी शाळेतील शिक्षकांनी त्याला सैन्य भरतीसाठी जाण्याचा सल्ला दिला. नगर येथील सैन्य भरतीत त्याची निवड झाली. २००४ मध्ये त्याचे लग्न झाले. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. त्यांची सैन्य दलात अठरा वर्षे सेवा झाली असून, सध्या ते राजस्थान येथे सीमेवर देशसेवेचे कर्तव्य बजावीत आहेत.

कुस्तीत राज्यात तिसरा
नानासाहेबला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. शाळेत असताना शिक्षकांनी त्याच्यातील गुणवत्ता ओळखली. शाळेच्या माध्यमातून कुस्ती स्पर्धेत सहभागी होत त्याने तालुका, जिल्हा, विभागस्तरावर प्रथम, तर राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावीत शाळेसह गावाचे नाव उज्ज्वल केले.

Web Title: army soldier success nanasaheb fatangade motivation