esakal | एका कलाशिक्षकाचा अभ्यासास चालना देणारा छंद 
sakal

बोलून बातमी शोधा

suresh-wargantiwar

विद्यार्थ्यांना चित्रकला आत्मसात करताना शिल्प, स्थापत्य, संग्रहालयं, पुरातत्त्व यासारख्या विषयांचीही तोंडओळख व्हावी म्हणून ही कात्रणं त्यांनी जमवली आहेत.

एका कलाशिक्षकाचा अभ्यासास चालना देणारा छंद 

sakal_logo
By
नीला शर्मा

सुरेश वरगंटीवार यांनी निरनिराळ्या वर्तमानपत्र व नियतकालिकांमधून कलाविषयक आलेल्या माहितीचा संग्रह करण्याचा छंद 20 वर्षांपासून जोपासला आहे. ते पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये (रमणबाग) कलाशिक्षक व पर्यवेक्षक आहेत. विद्यार्थ्यांना चित्रकला आत्मसात करताना शिल्प, स्थापत्य, संग्रहालयं, पुरातत्त्व यासारख्या विषयांचीही तोंडओळख व्हावी म्हणून ही कात्रणं त्यांनी जमवली आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एखादा कलाशिक्षक आपल्या व विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारण्यासाठी किती व कशी मेहनत घेतो, याचं चालतंबोलतं उदाहरण म्हणजे सुरेश वरगंटीवार. चित्रकला हा विषय आपल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक जवळचा वाटावा, त्यात त्यांना जोमदार करिअर करावंसं वाटावं, या उद्देशाने वरगंटीवार माहितीचं दुर्लभ भांडार पुरवतात. यासाठी 20 वर्षांपासून त्यांनी वर्तमानपत्र व नियतकालिकांमध्ये कलाविषयक येणाऱ्या बातम्या, लेख, मुलाखती, समीक्षा व छायाचित्रांची कात्रणं जमविण्याचा छंद जोपासला आहे. आतापर्यंत 750 कात्रणांचा संग्रह त्यांनी केला आहे. 

वरगंटीवार म्हणाले, ""चित्रं, व्यंगचित्र, बालकांनी काढलेली चित्रं, भारतीय व परदेशांतील चित्रकार, चित्रप्रदर्शनं, कार्यशाळा, परीक्षण, घडामोडी अशा अनेक घटनांचा हा एक प्रकारचा दस्तऐवज तयार झाला आहे.'' 

वरगंटीवार यांनी केवळ चित्र एके चित्र, अशी कडेकोट सीमा न ठेवता विद्यार्थ्यांच्या कलाविषयक जाणिवा बहराव्या यासाठी विविध कलाक्षेत्राबद्दल मिळणारं अक्षरधन जतन केलं आहे. यात शिल्प, मातीकाम, पुरातत्त्व, मंदिराचं स्थापत्य, संग्रहालयं, हस्तलिखितं वगैरेंवरचं साहित्य वर्गवारी करून पाच अल्बममध्ये सांभाळून ठेवलं आहे. त्यांनी असंही सांगितलं की, चित्रकलेचा उपयोग 

विद्यार्थ्यांना जीवनात आनंद फुलविण्यासाठी करता यावा. यात उत्तम प्रकारे करिअर करण्याची प्रेरणा त्यांना व्हावी. या दृष्टिकोनातून संगणकाचा चित्रकलेसंबंधी वापर, ऍनिमेशन तसंच सुलेखन वगैरेंवरची कात्रणं त्यांना दाखवतो. त्यातल्या काही गोष्टी सोप्या भाषेत समजावून सांगतो. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या उपक्रमांसाठी या संग्रहाचा उपयोग होतो. हे पाहून माझे चित्रकार गुरू मिलिंद फडके यांनी स्वतः लिहिलेले 40 लेख यात भर घालायला दिले, ही मला फार मोठी पावती वाटते.