ग्लॅमरमागचं समाजभान

jacqueline fernandez
jacqueline fernandez

एकीकडे ग्लॅमरच्या विश्वात काम करता करता जॅकलिन फर्नांडिसनं सामाजिक कामांमध्येही ठोस काम केलं आहे. प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीविरोधात आवाज उठविण्यापासून समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेपर्यंतच्या मोहिमांना आवाज देणारी ही अभिनेत्री. ट्विटपासून ‘ऑक्शनिंग’पर्यंत अनेक माध्यमांचा वापर करून समाजभान जपणारी जॅकलिन इतरांपेक्षा वेगळी दिसते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जॅकलिन फर्नांडिस ही रुपेरी पडदा स्वतःच्या ग्लॅमरनं उजळवून टाकणारी अभिनेत्री. मात्र, समाजवर्तुळात तिची ओळख तेवढीच नाही. प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीविरोधात आवाज उठविण्यापासून समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेपर्यंतच्या मोहिमांना आवाज देणारी ही अभिनेत्री आहे. ट्विटपासून ‘ऑक्शनिंग’पर्यंत अनेक माध्यमांचा वापर करून समाजभान जपणारी जॅकलिन इतरांपेक्षा वेगळी दिसते. सुरुवातीला स्वतःचं ब्रँडिंग करताकरता जॅकलिनला ग्लॅमरचा उपयोग सामाजिक कामासाठीही करता येतो ते समजलं आणि मग तिनं सामाजिक कामाचा व्याप वाढविला. महिला सशक्तीकरणासाठी ‘प्रोजेक्ट एव्हरीवन’ या संस्थेला ती मदत करते आणि त्यांच्या एका व्हिडिओत सहभागी होऊनही तिनं या सशक्तीकरणाचं महत्त्व पटवून दिलं आहे. 

जॅकलिनच्या सामाजिक कामाला ‘बूस्ट’ मिळाला तो तिनं प्राण्यांसाठी केलेल्या कामातून. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ‘पेटा’ या संस्थेसाठी जॅकलिन काम करते. प्राण्यांवर चाचण्या करून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांविरुद्ध आणि सौंदर्यप्रसाधनांविरुद्ध तिनं आवाज उठविला. मुंबईतल्या घोडागाड्यांविरोधातल्या मोहिमेतही ती सहभागी होती. श्रीलंकेतला एक दुर्लक्षित हत्ती अभयारण्यात नेण्यासाठी तिनं सोशल मीडियाचा वापर केला. तिच्या या सगळ्या कामातल्या सातत्याची दखल घेऊन ‘पेटा’नं २०१४ मध्ये तिला ‘वुमन ऑफ द इअर’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं. तमिळनाडूत चक्रीवादळानंतर अनेकांची घरं उद्‍ध्वस्त झाली. ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’ संस्थेनं तिथं घरं बांधण्यासाठी मोहीम हाती घेतली. या मोहिमेला मदत म्हणून जॅकलिननं ‘जॅकलिन बिल्ड्स’ नावाची मोहीम सुरू केली. त्यातून अनेकांनी प्रतिसाद दिला आणि आज सुमारे दहा हजार लोकांसाठी घरं बांधण्याबाबत काम सुरू आहे. 

एकीकडे सामाजिक काम करताकरता जॅकलिन उद्योजकसुद्धा बनली आहे. त्यातही तिनं वेगळेपण दाखवलं आहे. ‘जस्ट एफ’ नावाचा ब्रँड तिनं सुरू केला आहे. हे अर्थातच महिलांसाठीचे हे कपडे असणार, हे तर उघडच आहे; पण जॅकलिननं त्यांचं डिझाइन करतानाही एक नवीन कल्पना आणली आहे. तिनं या कपड्यांना ‘ॲक्टिव्ह वेअर’ असं नाव दिलं आहे. हे कपडे जिममध्ये व्यायाम करतानाही परिधान करता येतील आणि एखाद्या रेस्टॉरंटमध्ये कॉफी प्यायला जातानाही वापरता येतील, अशा पद्धतीनं त्यांची रचना करण्यात आली आहे. ‘फॅशन’ आणि ‘फंक्शन’ यांचा मिलाफ तिनं साधला आहे. जॅकलिनची आईही उद्योजिका आहे. बहारीनमध्ये ती कपड्यांचा व्यवसाय चालविते. त्यामुळे उद्यमशीलतेचं बीज जॅकलिनच्या रक्तातच आहे. तिनं फक्त त्याला ग्लॅमर आणि कल्पकता यांची जोड दिली आहे. ग्लॅमरला समाजभान आणि उद्यमशीलतेची जोड देऊन जॅकलिननं या क्षेत्रातल्या सगळ्यांनाच प्रेरणा दिली आहे. 

जगाला स्त्रीशक्तीची जाणीव करून देण्याची गरज आहे. महिला सशक्तीकरणाला बळ दिलं पाहिजे. महिलांना सुरक्षित, समर्थ वाटलं पाहिजे, अशा प्रकारचं पोषक जग तयार करण्यासाठी सगळ्यांनी मदत केली पाहिजे.
- जॅकलिन फर्नांडिस

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com