शेटफळच्या भांगे दांपत्याने दिला अनेकांना आधार 

राजाराम ल. कानतोडे - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 3 डिसेंबर 2016

सोलापूर - स्वतःच्या मुलाचे मुकेपण दूर करतानाच्या धडपडीत शेटफळच्या जयप्रदा आणि योगेश भांगे दांपत्याने आतापर्यंत 50 ते 55 मुलांना प्रशिक्षणाने बोलायला शिकविले आहे. सखोल अभ्यासाबरोबर ताटवाटी चाचणी, मुकेपणा निर्मूलन केंद्राची उभारणी, पालकांचे प्रेम आणि पुरस्कार या गोष्टी त्यांच्या हाताशी लागल्या. आता महाराष्ट्रातूनच मुकेपणा निर्मूलन झाले पाहिजे, असा ध्यास त्यांनी घेतला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील शेटफळच्या (ता. मोहोळ) जयप्रदा आणि योगेश भांगे यांचा मुलगा प्रसून दीड वर्षाचा असताना त्याला ऐकू येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याला श्रवणयंत्र बसवायला दोन वर्षे गेली. त्यासाठी पुण्यात अलका हुदलीकर यांच्याकडे "स्पीच थेरपी' शिकून घेतली. आता तो शेटफळच्या सर्वसाधारण मुलांबरोबर अकरावीत शिकत आहे. त्याचबरोबर तो वेब डिझाइनिंगचा अभ्यासक्रमही करीत आहे. आता त्याचाही या कामात येण्याचा मानस आहे. 

मुलाच्या व्यंगानंतर भांगे दांपत्याने 2005 पासून मूक मुलांसाठी काम करण्यास सुरवात झाली. त्यांनी आतापर्यंत 50 ते 55 मुलांना प्रशिक्षण देऊन बोलायला शिकविले आहे. पालकांच्या आग्रहावरून 2009 मध्ये "व्हाइस ऑफ व्हाइसलेस' या संस्थेची स्थापना त्यांनी केली. त्यानंतर मुंबईतील "कोरो' या संस्थेची फेलोशिप त्यांना मिळाली. भांगे यांनी सोलापूर जिल्ह्यातील मूक मुलांविषयीचा अभ्यास केला. मूकबधिर मुलांसाठी ताटवाटी चाचणी राबविण्यात आली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख 86 हजार मुलांची चाचणी घेतली. त्यातली 89 मुले संशयित कर्णबधिर म्हणून आढळली. या मुलांची परत चाचणी घेतली. त्यात ही सगळी मुले कर्णबधिर असल्याचे समोर आले. आता शेटफळमध्येच ते मुकेपणा निर्मूलन केंद्र उभे करीत आहेत. त्यासाठी सोलापुरातील प्रिसीजनसह विविध संस्था मदतीचा हात देत आहेत. 

महाराष्ट्राला केवळ ताटवाटी चाचणी देऊन उपयोग नाही. आता आमच्या संस्थेत येणाऱ्या पालकांच्या आणि मुलांच्या मदतीने हा एक महिन्याचा अभ्यासक्रम आम्ही तयार करीत आहोत. 
- जयप्रदा भांगे, व्हाइस ऑफ व्हाइसलेस, शेटफळ

Web Title: bhange family give support