भावासाठी सायकलीला व्हीलचेअर!

चिंतामणी क्षीरसागर
गुरुवार, 10 जानेवारी 2019

वडगाव निंबाळकर - दिव्यांग भावाला शाळेत ने-आण करण्यासाठी वडिलांना दररोज यावे लागत होते. त्यावर उपाय म्हणून तिने स्वतःच्या सायकलमध्ये बदल करून भावाची व्हीलचेअर जोडून घेतली. आता दोघेही शाळेत एकत्रपणे ये-जा करत आहेत. दिव्यांग भावाच्या प्रेमापोटी तिने बनवलेली सायकल परिसरात चर्चेचा विषय तर ठरलीच; पण राज्य पातळीवर तिचा हा व्हीलचेअरचा प्रयोग निवडण्यात आला आहे.

मयूरी पोपट यादव असे सायकल बनविणाऱ्या या मुलीचे नाव आहे. ती होळ (ता. बारामती) येथील आनंद विद्यालयात दहावीत शिक्षण घेत आहे. निखिल हा तिचा धाकटा भाऊ असून, तो दिव्यांग आहे. तो आनंद विद्यालयातच इयत्ता सहावीत शिक्षण घेतो. दोघेही सदोबाची वाडीतून अर्धा किलोमीटर अंतरावरून होळ येथील आनंद विद्यालयात शिक्षणासाठी येतात. भावाला नियमित ने-आण करण्यासाठी वडिलांना वेळ काढावा लागत  होता. भावासाठी तिलाही थांबून राहावे लागत होते. 

भावाची ही अडचण कशी दूर करता येईल, याबाबत ती विचार करत होती. त्यातून तिला आपल्या सायकलच्या पुढच्या भागाला व्हीलचेअर जोडण्याची कल्पना सुचली. त्यासाठी तिने गावातील सायकल दुकानदाराची मदत घेतली. विज्ञान विषयाच्या शिक्षिका कांतिका वसेकर यांनी तिला प्रोत्साहन दिले. आता दोघेही एकाच सायकलवरून शाळेत ये-जा करत आहेत. दिव्यांग भावाला शाळेत घेऊन जाणारी बहिणीची ही सायकल परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे. 

राज्य प्रदर्शनासाठी निवड
गेल्या आठवड्यात नसरापूर (ता. भोर) येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मयूरीची सायकल ठेवण्यात आली होती, या सायकलची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे, अशी माहिती आनंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एस. आतार यांनी दिली. या यशाबद्दल मयूरीचा संस्थेचे अध्यक्ष शांताराम होळकर, प्रमोदकुमार गिते, सिद्धार्थ गिते, सरपंच स्नेहा गिते, आनंदकुमार होळकर यांच्या हस्ते सन्मान केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bicycle wheel chair for brother