मोळेश्‍वरात ‘पक्ष्यांना वाचवूया’ उपक्रम

सुनील शेडगे
बुधवार, 10 एप्रिल 2019

नव्या पिढीत पक्षिप्रेम, पर्यावरणप्रेम रुजविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. पक्ष्यांना वाचवा, ते पर्यावरणाला वाचवतील, हा संदेश लोकांपर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- सविता बारंगळे, शिक्षिका, मोळेश्वर (ता.जावळी)

नागठाणे - पक्षी हा बालपणापासूनच सर्वांच्याच अगत्याचा विषय. अलीकडच्या काळात मात्र पक्ष्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मोळेश्वर शाळेतील चिमुरड्यांनी ‘पक्ष्यांना वाचवूया’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

मोळेश्वर हे जावळी तालुक्‍यातील कास परिसरात डोंगर उंचावर वसलेले गाव आहे. भोवताली विस्तृत वृक्षराजी. गावातील प्राथमिक शाळेत प्रतिभा जाधव व सविता बारंगळे या शिक्षिका कार्यरत आहेत. अलीकडच्या काळात दोघीही तिथे नव्याने रूजू झाल्या आहेत. दुर्गम भाग असूनही विविध उपक्रमांतून त्यांनी शाळेचा कायापालट केला आहे. त्यांचा ‘पक्ष्यांना वाचवूया’ हा उपक्रम सध्या कौतुकाचा विषय ठरला आहे.

सध्याच्या कडक उन्हाळ्यात पक्ष्यांनाही खाद्याची, पाण्याची समस्या भेडसावताना दिसते. पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढते. यावर उपाययोजना करताना शिक्षिकांनी मुलांचे, पालकांचे प्रबोधन केले. घरातील श्रीखंड, आइस्क्रिमचे रिकामे डबे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या एकत्र केल्या. दोऱ्याच्या साह्याने त्या बांधून त्यात पक्ष्यांसाठी ज्वारी, गहू, तांदूळ, नाचणी तसेच पाणी ठेवण्यात आले. शाळेत ये-जा करताना मुले हे सारे वेगळ्या जाणीवेने करतात. अर्थात एवढेच करून या शिक्षिका थांबल्या नाहीत. मोळेश्वरालगतच्या आखाडी मुरा या गावात जाऊनही त्यांनी ग्रामस्थांत जागृती केली. त्याची फलश्रृती आशादायक ठरत आहे. गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, विस्तार अधिकारी कल्पना तोरडमल, केंद्रप्रमुख अशोक मनूकर आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Web Title: Bird Saving Water Summer Child Motivation