कडू कारल्याने जीवनात आणली गोडी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

कळस (ता. इंदापूर) येथील संतोष बापूराव धायतोंडे या शेतकऱ्याने पत्नी शुभांगी यांच्या मदतीने एक एकर कारल्याच्या पिकातून चार महिन्यांत तीन लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळविले आहे.

कळस - शेतीत द्राक्षे लावली. तीन-चार वर्षे प्रयत्न करूनही सफलता हाती नाही आली. उत्पन्नाच्या बाबतीत आंबट ठरलेली द्राक्षे काढून, त्या जागेवर कडू कारल्याची लागवड केली.आणि गेल्या दोन महिन्यांपासून याच कडू कारल्याने जीवनात गोडी आणली. 

कळस (ता. इंदापूर) येथील संतोष बापूराव धायतोंडे या शेतकऱ्याने पत्नी शुभांगी यांच्या मदतीने एक एकर कारल्याच्या पिकातून चार महिन्यांत तीन लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळविले आहे. वर्षभर कष्ट करून व मुबलक भांडवल खर्च करूनही ज्या शेतात द्राक्षासारख्या पिकाने साथ दिली नाही, त्याच शेतात कमी खर्चात व वेळेत त्यांनी कडू कारल्यातून लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बागवाडीलगत संतोष धायतोंडे यांची शेती आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत गेल्या काही वर्षांपासून ते विविध पिकांच्या माध्यमातून शेतीत नवनवीन प्रयोग राबवीत आहेत. परिसरातील द्राक्ष शेतीची माहिती घेऊन त्यांनी काही वर्षांपूर्वी नानासाहेब जंबो द्राक्षाची लागवड केली. मात्र, यामध्ये  त्यांना यश आले नाही. यासाठी उभारलेले स्टेजिंग व ठिबक सिंचन तसेच ठेवले. याच स्टेजिंगचा वापर करून कारल्याची लागवड केली. 

१२ टन कारले, तीन लाख उत्पन्न
मल्चिंग पेपरचा उपयोग करून त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन व तण रोखले. शिवाय, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याबरोबर द्रवयुक्त खते दिली. केवळ ७० हजारांच्या खर्चात नवे पीक काढणीस आले. पहिल्या तोड्याला त्यांना टनभर कारले मिळाले. दरही चांगला मिळाला. यानंतर दिवसाआड कारल्याची तोडणी सुरू झाली. आतापर्यंत १२ टन कारले मिळाले आहे. यातून त्यांना तीन लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कारल्याचे आर्थिक गणित
 दिवसाआड तोड्यातून सहाशे किलोहून अधिक कारले मिळते
 प्रतिकिलो ३२ रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत दर मिळतो
 पावसामुळे आणखी एका द्राक्ष बागेतील वेलींमध्ये मालकाडी तयार न झाल्याने, ३० गुंठे क्षेत्रावरही कारल्याची लागवड केली
 कारल्याचे उत्पादन आणखी महिनाभर सुरू राहण्याची शक्‍यता 
 त्यातून किमान दोन लाखांपर्यंतचे उत्पादन मिळण्याची आशा आहे

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

द्राक्ष पिकासाठी अफाट कष्ट उपसून व भांडवल खर्चूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे विविध रोगांच्या प्रादुर्भावास तोंड द्यावे लागत होते. यामुळे द्राक्ष बाग काढून याठिकाणी कारल्याची शेती पिकविण्याचा निर्णय घेतला. पत्नी शुभांगीने मोलाची साथ दिली. यामुळे कडू कारल्यातून गोड उत्पन्न मिळविण्यास आम्हाला यश आले आहे. 
- संतोष धायतोंडे, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bitter gourd crop has fetched more than Rs 3 lakh in four months.