वधू-वरांसह वऱ्हाडींचेही श्रमदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

लोधवड्यात वेगळा उपक्रम; कोमल व तुषार यांना घरच्यांचा पाठिंबा
मलवडी - महाराष्ट्राला जलसंधारणाची दिशा देणारे, राज्य शासनाचे विविध पुरस्कार पटकाविणारे व सध्या स्मार्ट व्हिलेजचा पुरस्कार पटकावलेल्या लोधवडे (ता. माण) गावाने आज वेगळा उपक्रम राबविला. फक्त वधू-वरच नव्हे तर संपूर्ण वऱ्हाडाने शिवारात श्रमदान केले.

लोधवडेच्या कोमल माने व तुषार चोपडे यांचा उद्या (ता. २३) विवाह आहे. हे दोघेही लोधवड्यात झालेली जलसंधारणाची कामे पाहत व करत मोठे झाले. ग्रामस्वच्छता असो वा जल व मृद्‌संधारण या कामात ग्रामस्थांनी हिरीरिने घेतलेला सहभाग त्यांनी पाहिला होता. या श्रमदानामुळेच दुष्काळावर मात करण्यात लोधवडेकरांनी यश मिळविले, हे त्यांना उमगले होते. त्यामुळेच आयुष्याच्या नवीन वळणावर प्रवेश करताना या दोघांनी श्रमदान करण्याचा निर्धार केला. या त्यांच्या निर्धाराला दोन्ही घरांतील वरिष्ठांनीही पाठिंबा दिला.

आज सकाळी सुतारकीच्या माळात ग्रामस्थांसोबत श्रमदान करण्यासाठी वधू-वरासह संपूर्ण वऱ्हाडी मंडळी उपस्थित झाली. नवरदेव तुषार याने फावडे हातात घेवून माती भरण्यास सुरवात केली. माती भरलेली घमेली नवरी कोमल हिने बांधावर टाकली. या दोघांबरोबरच सर्व वऱ्हाडी मंडळी बांध- बंदिस्ती करण्यास सरसावली. 

लोधवडेला जलयुक्त बनविण्यासाठी प्रभाकर देशमुख व अनुराधा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी अविरत कष्ट घेतलेत. त्यात सहभाग व्हावे म्हणून आम्ही श्रमदानात सहभागी झालो. 
- कोमल माने

लोधवडेकरांनी जलसंधारणाच्या कामातून पाणीदार बनविण्यात यश मिळविले आहे. या कामाला प्रेरणा मिळावी व तरुणांना श्रमाचे महत्त्व कळावे म्हणून आम्ही हा अभिनव उपक्रम राबविला. 
-अनुराधा देशमुख

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bride & groom labour donate in lodhwade