अडल्या-नडलेल्यांचा हक्काचा माणूस

Cadbury Dairy Milk thanks to Bunty Sawant for his outstanding work
Cadbury Dairy Milk thanks to Bunty Sawant for his outstanding work

पुणे: जवळच्या व्यक्तीला रूग्णालयात दाखल केल्याने आधीच भांबावलेले नातेवाईक, मध्येच कागदपत्रे मागितल्याने त्यांची उडालेली धांदल. त्यात अशिक्षित असल्यावर तर अडचणीत आणखी भर. "हे आणा, ते आणा' असे आदेश निघत असल्याने काय करावे, तेच त्यांना सुचेनासे होते. अशावेळेस एकाच व्यक्तीची सर्वांना आठवण येते, ते म्हणजे बंटी सावंत. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) शासकीय रूग्णालयात अडल्या-नडलेल्यांसाठी हक्काचा माणूस. अगदी पु. ल. देशपांडे यांच्या नारायणसारखा.

कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) हे शासकीय रूग्णालय थोरला दवाखाना म्हणूनच जिल्ह्यात परिचित आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांसाठी आधारवड अशी या रूग्णालयाची ओळख आहे. कोल्हापूर शहर असो किंवा जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा जरूर वाढल्या. पण, "सीपीआर'मध्ये आल्यानंतर मोफत उपचाराची शंभर टक्के खात्री असल्याने आजही रोज येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मुळात रूग्णालयाचा परिसर मोठा असून, जिल्ह्यातून येणाऱ्या सर्वच लोकांना हा सारा परिसर माहिती नाही. त्यामुळे येथे आल्यानंतर एखादा विभाग शोधण्यापासून ते विविध तपासण्या आणि इतर गोष्टींसाठी हमखास मदत करणारा माणूस म्हणजे बंटी सावंत. बंटी यांचे नाव वीरेंद्र आहे. मात्र, सर्व जण त्यांना बंटी म्हणूनच ओळखतात.

मुळात बंटी सावंत सीपीआर येथे भांडारपाल म्हणून 2000 पासून नोकरीला आहे. मात्र, येथे अडल्या-नडलेल्यांसाठी हक्काचा माणूस अशी त्यांची ओळख आहे आणि म्हणून त्यांच्याकडे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत कुणी जरी एखाद्या मदतीसाठी गेले तर हमखास मदत मिळणार म्हणजे मिळणारच. रूग्णालयात दाखल झाल्यानंतर विविध योजनांसाठी अनेक कागदपत्रे लागतात. ती व्यवस्थित जोडून रूग्णालयाकडे सादर करावी लागतात. मात्र, सर्व रूग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना या साऱ्या गोष्टी जमतातच असे नाही. अशावेळी हा माणूस मदतीसाठी हजर असतो.

कोरोनाच्या काळात तर सीपीआर हे कोविड रूग्णालय बनले आणि बंटी यांनी कोरोना वॉरियर्स म्हणून मोलाचे योगदान दिले. या काळात सीपीआर परिसरात अनेकांची धावपळ सुरू असायची, अनेकजण चिंता व तणावाखाली असायचे. अशा वेळी बंटी सावंत हे अनेकांच्या मदतीला धावून जात आहेत. त्यांना मानसिक आधार देऊन, योग्य मार्गदर्शन करीत आहेत. कोरोनाच्या काळात रोज येणारे विविध नियम आणि आदेशांचे पालन करूनच येथील व्यवस्थापनाला निर्णय घ्यावे लागतात आणि या साऱ्यांमध्ये रूग्णाच्या नातेवाईकांची तारांबळ उडते. स्वॅबपासून ते क्वारंटाईनपर्यंत आणि ई-पासपासून ते क्वारंटाईनच्या कालावधीपर्यंतच्या सर्व प्रकारच्या माहितीसाठी बंटी यांची मदत रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोलाची ठरत आहे. जिल्हाभर असणाऱ्या दांडग्या जनसंपर्कामुळे बऱ्याचदा रूग्णाच्या नातेवाईकांच्या मनातील कोरोनाबाबतचे अनेक गैरसमज दूर करण्यासाठीही त्यांची मदत झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com