मायेचं आभाळ म्हणजे डॉ. सीमा वाघमोडे

Cadbury Dairy Milk thanks to Seema Waghmode for her outstanding work
Cadbury Dairy Milk thanks to Seema Waghmode for her outstanding work

पुणे: वारांगणा अर्थात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचे पोर म्हटलं, की कोणाच्याही कपाळावर आठ्या पडाव्यात; पण याच लेकरांसाठी डॉ. सीमा वाघमोडे मायेचं आभाळ बनल्या आहेत. समाजाच्या हिनतेच्या नजरा ज्यांच्यावर पडाव्यात, त्या उपेक्षित मुलांना आपलसं करीत त्यांचं आयुष्य फुलविण्याचं काम सीमाताई करताहेत.

वेश्या व्यवसायात महिला पडतात, ती केवळ मजबुरीमुळे. समाज त्यांच्याकडे तुच्छतेने पाहत असला तरी त्यांच्यातही आईचं काळीज असतंच ना! पण केवळ परिस्थितीमुळे त्यांना आपल्या मुलांना योग्य शिक्षण देता येत नाही. त्यामुळे ही मुलं अनेकदा वाममार्गाला जाण्याची शक्यता असते. या मुलांच्या नशिबी येणाऱ्या दुःखानं सीमाताईंचं मन हेलावून जायचं. त्यातूनच त्यांनी या मुलांच्या पुनर्वसनासाठी इंदापूर तालुक्यातील बोरी येथे "रेव्हरंड हरिभाऊ वाघमोडे-पाटील प्रतिष्ठान'ची स्थापना केली. या केंद्रात त्यात सध्या साठ मुले आहेत. या मुलांचा सीमाताई अगदी मायच्या मायेने सांभाळ करताहेत. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्या या मुलांचे हट्ट पुरवतात. त्यांनी शिकावं-मोठं व्हावं, यासाठी त्यांचा तीळ तीळ तुटतो. त्यातूनच त्या मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देतात. त्यांना आरोग्यविषयक सर्व सुविधा पुरवण्याबरोबरच त्यांचे शिक्षण पूर्ण करून ते नोकरी-धंद्याला लागेपर्यंत सीमाताई त्यांच्यामागे सावलीसारख्या उभ्या राहतात. 

इतकेच नव्हे, तर त्यांचे लग्न लावून देण्याची जबाबदारीही डॉ. वाघमोडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पार पाडली जाते. एकदा का, त्यांच्या अंगाला हळद सीमाताई समाधानानं भरुन पावतात. सीमाताईंच्या या आपलेपणामुळे केंद्रातील मुलांनाही आपला इतिहास काय आहे, यापेक्षा भविष्य किती उज्ज्वल असू शकते, याचा विचार करत शिक्षणाची कास पकडली आहे. अनेक संधी असलेल्या भविष्याकडे त्यांचा प्रवास सुरू आहे. प्रतिष्ठानच्या ट्रस्टी म्हणून कार्यरत असलेल्या सीमाताई सांगतात, की सुरुवातीला आम्ही "कायाकल्प' संस्थेच्या माध्यमातून पुण्यात या मुलांच्या पुनर्वसनाचे काम करत होतो. ही मुलं दिवसभर आमच्याकडे असायची व रात्री त्यांच्या आईकडे जायची. मात्र तेथील सर्व वातावरण पुन्हा त्यांच्या मनावर काहीसे आघात करत होते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी आम्ही त्यांना इंदापूरला घेऊन आलो. त्यांच्या आईला परिस्थितीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यात या मुलांचा दोष नाही. 

या मुलांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. अनेक सेवाभावी संस्था आणि नागरिक या कामात मदत करीत आहेत. संस्थेतील काही मुले एचआयव्हीने ग्रस्त आहेत. त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार पुरवण्यात येत असून, सगळी काळजी प्रतिष्ठान घेत आहे. या मुलांना चांगले जीवन जगण्याचा आणि शिक्षण मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे. गरीब, अनाथ किंवा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. मात्र या मुलांकडे अद्याप पुरेसे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही ही जबाबदारी स्वीकारली. या मुलांना अजूनही मदतीची गरज आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संघटनांनी पुढे आले पाहिजे,'' अशी अपेक्षाही सीमाताई व्यक्त करताहेत. येत्या काळात शंभर मुलांचा सांभाळ करण्याचे ध्येय असल्याचेही त्या सांगतात.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com