कोल्हापूरची नाळ नाही दिली तुटू

कोल्हापूरची नाळ नाही दिली तुटू

कोल्हापूर - हा माणूस कोल्हापूरचा. आता वय ८५ वर्षे. शिक्षणाच्या निमित्ताने इंग्लंडला गेला. तेथून कॅनडामध्ये नोकरीला गेला. तिथलाच रहिवासी झाला. त्यांचा मुलगा कॅनडा एअर फोर्समध्ये मेजर झाला. कॅनडात अतिशय सुखात असलेल्या या माणसाने कोल्हापूरची नाळ मात्र कधी तुटू दिली नाही. त्याने सानेगुरुजी वसाहतीमधील आपला मोठा बंगला बालवाडीसाठी दिला. बायकोची आठवण राहावी, म्हणून तेथे बालवाडी सुरू केली.

आता हा माणूस कॅनडात खूप सुखी आयुष्य जगतोय; पण कोल्हापूरची नाळ इतकी घट्ट आहे, की वर्षातून तीन महिन्यांकरिता न चुकता कोल्हापुरात येतो. बालवाडीसाठी पुढच्या वर्षासाठी लागणारी तरतूद स्वतः करतो. इथल्या सर्व मित्रांना, नातेवाइकांना भेटतो आणि पुन्हा कॅनडास जातो.
आताही हा माणूस कोल्हापुरात आला आहे. बालवाडीसाठी दिलेल्या बंगल्यात खालच्या मजल्यावर एकटा राहतो आहे. हे कोल्हापूर माझे आहे. कोल्हापुरातली मुले लहान वयातच या बालवाडीत वेगळे काही शिकून संस्कारित व्हावीत, बालवाडीच्या निमित्ताने आपल्या दिवंगत पत्नी सुलेखा यांची स्मृती जपली जावी. एवढाच या माणसाचा हेतू आहे.

या माणसाचे नाव विश्‍वास वसंतराव बागल. त्यांचे वडील ॲड. वसंतराव बागल म्हणजे स्वातंत्र्यानंतर कोल्हापुरात जे स्वतंत्र मंत्रिमंडळ होते. त्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री. बागल कुटुंबीय पुरोगामी आणि लोकाभिमुख चळवळीतले. त्यामुळे विश्‍वास बागल हेदेखील त्या काळात एस. एस. डब्ल्यूच्या पदवीसाठी इंग्लंडला गेले.

तेथून कॅनडात चिफ सोशल वर्कर म्हणून शासकीय मनोरुग्ण उपचार हॉस्पिटलमध्ये नोकरीस लागले. मनोरुग्णांची मने जाणून घेण्याचा, त्यांना पुन्हा माणसांत आणण्याच्या नोकरीत ते रमले. त्यांची पत्नी सुलेखा यांनीही त्यांना या काळात खूप साथ दिली. या जोडप्याने कॅनडात हॅमिल्टन येथे चक्क आपल्या घरी वृद्धाश्रम चालू केला व पंधरा वर्षे चालवला.

विश्‍वास बागल यामुळे कॅनडाचेच रहिवासी झाले. त्यांचा मुलगा कौशिक कॅनडा एअर फोर्समध्ये मेजर झाला. मुलगी रेणुका हॅमिल्टन कॉर्पोरेशनमध्ये अकांउंट ऑफिसर बनली. 
विश्‍वास बागल १९९७ ला निवृत्त झाले. पत्नी सुलेखा यांचे अकाली निधन झाले. निवृत्तीनंतर त्यांनी कोल्हापुरातला बंगला विकण्याऐवजी तेथे पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ बालवाडी काढण्याचा निर्णय घेतला.

ऐसपैस बंगल्याचा पहिला मजला बालवाडीसाठी दिला. आणि तेव्हापासून दरवर्षी विश्‍वास बागल वर्षातून तीन महिने कॅनडातून कोल्हापुरात येतात. बालवाडीची पुढच्या वर्षीची सारी जोडणी करतात. त्यांच्या ---रेणुका बालवाडी सोनगुरुजी वसाहतीत आहे. पूर्वा हाराळे, गवळी मॅडम, शिंदे मॅडम, भावना मॅडम, रंजना मॅडम व सुधा मॅडम ही बालवाडी चालवतात.

मातीची ओढ कायम
सानेगुरुजी वसाहतीत ८५ वर्षांचे विश्‍वास बागल बंगल्यात एकटे राहतात. शाळेच्या केअर टेकर रंजना व दिगंबर पाटील त्यांची काळजी घेतात. कोल्हापुरातल्या सर्व जुन्या मित्रांना, नातेवाईकांना ते ठरवून भेटतात. त्यांना जी करता येईल, ती मदत करतात व पुन्हा नऊ महिन्यांसाठी कॅनडाला जातात. कॅनडाचा रहिवासी असलो. तेथे अतिशय सुखात असलो तरी कोल्हापूरची व पत्नी सुलेखाची आठवण कायम अस्वस्थ करते. म्हणून मी कोल्हापुरला येतो एवढेच ते सांगतात आणि तीन महिने कोल्हापुरात रमून जातात.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com