...आणि चंद्रकुमारच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

रामटेक - सहा वर्षांपूर्वी आईचा हात सुटल्याने सहा वर्षांपासून मतिमंद मुलांसमवेत त्याला राहावे लागले. दर महिन्यात होणाऱ्या निरीक्षणादरम्यान प्रथमश्रेणी न्यायाधीशांना हा मुलगा वेगळा वाटला. न्यायाधिशांनी पोलिस विभागाच्या मदतीने परराज्यात राहणाऱ्या त्याच्या आईवडिलांना शोधून ‘त्याला’ आईवडिलांच्या स्वाधीन केले. तो मुलगा आहे चंद्रकुमार निषाद. छत्तीसगडमधील रेवे, ता. बेरला, जि. देमेतारा येथील.

रामटेक तालुक्‍यात काचूरवाही येथे एकवीरा मतिमंद मुलांचे बालगृह आहे. बालकल्याण समिती, नागपूरद्वारे जिल्ह्यात सापडलेल्या मतिमंद मुलांना या बालगृहात ठेवले जाते. बालगृहांची दर महिन्यात तालुका विधिसेवा समितीचे अध्यक्ष न्या. माणिक वाघ यांनी बालगृहाला भेट दिली. येथील एक अठरा वर्षीय मुलाची विचारपूस केल्यावर त्याने आपले नाव चंद्रकुमार असून चंद्रपूर येथून हरवलो व छत्तीसगडमध्ये राहतो, असे सांगितले. न्या. वाघ यांनी चंद्रकुमारने सांगितलेला पत्ता घेऊन रामटेकच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नयन अलुरकर यांना शोध घेण्याचा आदेश दिला. रामटेकचे पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक मुत्तेपोड यांनी लगेच वायरलेसने संपर्क साधून संबंधित अनुज निषाद यांचा अवघ्या दोन दिवसांत छत्तीसगड राज्यातील देमेतेरा जिल्ह्यातील बेरला तालुक्‍यातील रेवे या गावी शोध लावला.

आपला चंद्रकुमार नावाचा मुलगा २०१२ मध्ये चंद्रपूर येथून हरविला होता. चंद्रपूर येथील रामनगर पोलिस स्टेशनला तशी तक्रार दिली असल्याची माहिती अनुज निषाद व त्यांची पत्नी गिरजाबाई यांनी दिली. त्यांना रामटेकला बोलावून त्यांची व चंद्रकुमार यांची भेट घडवून आणली.

चंद्रकुमारला येते मराठी 
चंद्रकुमारला लहानपणी डोक्‍याला मार लागल्याने तो मतिमंदासारखा वागू लागला होता. बालगृहात सहा वर्षे उपचार करण्यात आले. बालगृहात आला. त्यावेळी त्याला मोडकेतोडके छत्तीसगडी भाषा येत होती. मागील सहा वर्षांत शाळाप्रमुख टी. पी. जुनघरे यांच्या मार्गदर्शनात चंद्रकुमारला इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेचे शिक्षण दिले. चंद्रकुमार मराठीही बोलतो.