गरजूंसमवेत साजरा केला नाताळ

गिरीम (ता. दौंड) - विद्यार्थ्यांना भेटवस्तू देताना सांताक्‍लॉजच्या वेशातील विद्यार्थी.
गिरीम (ता. दौंड) - विद्यार्थ्यांना भेटवस्तू देताना सांताक्‍लॉजच्या वेशातील विद्यार्थी.

दौंड - दौंड शहरातील सेंट सेबॅस्टियन या कॉन्व्हेंट विद्यालयातील ११०० विद्यार्थ्यांनी नाताळनिमित्त दौंड, बारामती व श्रीगोंदे तालुक्‍यातील अन्य ११०० गरजू विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वितरण केले. 

सेंट सेबॅस्टियन विद्यालयाचे प्राचार्य रेव्हरंड डेनिस जोसेफ यांनी नाताळ गरजूंसमवेत साजरा करण्याच्या उद्देशाने आणि कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना अनाथ व गरजू विद्यार्थ्यांचे जीवन समजावे, याकरिता विद्यालयात एका संचात भेटवस्तू जमा करण्याचे आवाहन केले होते. गरजू विद्यार्थ्यांसाठी अंगाचे व कपड्यांचे साबण, खोबरेल तेल, टूथपेस्ट, छोटे टॉवेल, खेळणी, खाद्यपदार्थ, नेल कटर, मच्छर प्रतिबंधक क्रीम, टाल्कम पावडरचा डबा आदींचा समावेश असलेल्या वस्तूंचा संच एका पिशवीत आणून विद्यालयात जमा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक संच जमा करण्यात आला होता. 

हे ११०० संच घारगाव (ता. श्रीगोंदे) येथील सावित्रीबाई फुले निवासी शाळा, केडगाव (ता. दौंड) येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन, गिरीम (ता. दौंड) येथील सद्‌गुरू आश्रमशाळा, बारामती येथील बॉईज बोर्डिंग, दौंड शहरातील सडक अनाथाश्रम आदी ठिकाणी समक्ष जाऊन वितरित करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी प्रार्थना करण्यासह गीते सादर करीत गरजू विद्यार्थ्यांची दैनंदिनी जाणून घेतली. अनाथ असलेली व काही कारणांमुळे पालकांपासून लांब राहत आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर या वेळी संवाद साधण्यात आला. विद्यालयाचे पर्यवेक्षक नितीन शिरसाठ व पर्यवेक्षिका ज्यूडी विल्यम्स यांच्यासह एकूण १२५ विद्यार्थी, ३६ शिक्षक, पालक-शिक्षक संघाचे सदस्यांनी वितरणाचे संयोजन केले होते.

भिक्षेकऱ्यांसाठी स्नेहभोजन  
नाताळनिमित्त सेंट सेबॅस्टियन कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेव्हरंड डेनिस जोसेफ व प्रा. मनोहर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शहरातील विविध प्रार्थनास्थळांच्या बाहेरील भिक्षेकऱ्यांना सेंट सेबॅस्टियन विद्यालयात स्नेहभोजन दिले. भिक्षेकऱ्यांची ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com