esakal | कौतुकास्पद! सुळपणीच्या डोंगरावर प्राचीन पाण्याच्या टाक्यांचा कायापालट
sakal

बोलून बातमी शोधा

Sulpani Mountain

कुशी (ता. सातारा) गावालगतच्या सुळपणीच्या प्रसिद्ध डोंगरावर असलेल्या प्राचीन पाण्याच्या टाक्यांचा श्रमदानातून कायापालट झाला आहे.

कौतुकास्पद! सुळपणीच्या डोंगरावर प्राचीन पाण्याच्या टाक्यांचा कायापालट

sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (सातारा) : कुशी (ता. सातारा) गावालगतच्या सुळपणीच्या प्रसिद्ध डोंगरावर (Sulpani Mountain) असलेल्या प्राचीन पाण्याच्या टाक्यांचा (Ancient Water Tank) श्रमदानातून कायापालट झाला आहे. त्यासाठी युवकांचा पुढाकार अन् त्याला लाभलेली ग्रामस्थांची साथ महत्त्वपूर्ण ठरली. त्यातून सहा फूट साचलेला गाळ काढण्यात आला. अलीकडच्या काळात सुळपणीचा निसर्गरम्य डोंगरमाथा पर्यटकांचे (Tourists) आकर्षण बनत आहे. येथील सिद्धनाथाचे मंदिरही (Siddhanath Temple) भाविकांचे श्रद्धास्थान आहे. (Citizens Cleaned The Ancient Water Tanks On Sulpani Hill Satara Marathi News)

गेल्या दोन वर्षांपासून सर्वांच्याच एकजुटीने या परिसराला नवे रूप लाभले आहे. अशातच काल परिसरातील महामुलकरवाडी (ता. जावळी) येथील युवकांनी मंदिर परिसरात असलेल्या प्राचीन पाण्याच्या टाक्यांची श्रमदानाने स्वच्छता केली. या पाण्याच्या टाक्यांची अत्यंत खुबीने रचना करण्यात आली आहे. दगडात हे टाके आहेत. मात्र, वर्षानुवर्षे गाळ साचत राहिल्यामुळे हे टाके दुर्लक्षित राहिले होते. सुमारे २० वर्षांपूर्वी जगन्नाथ महामुलकर, किसन महामुलकर, सोनबा पिसाळ यांसारख्या वयस्कर लोकांनी या परिसरात पाण्याचे प्राचीन टाके असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा: 1880 काळातील वटवृक्षाची आजही केली जाते पूजा

त्यानुसार संजय पिसाळ, लालसिंग महामुलकर, वैभव भोईटे, प्रदीप काकडे आदींनी टाक्यांची स्वच्छता केली होती. मात्र, टाक्यांच्या खोलीचा अंदाज येत नव्हता. अशा स्थितीत राजेंद्र महामुलकर, सदाशिव साळेकर, लालसिंग महामुलकर, विपीन डांगे, सरपंच अमोल काकडे आदींनी अत्यंत परिश्रमाने, निर्धारपूर्वक टाके स्वच्छ केले. त्यामुळे त्याचे मूळ रूप उजेडात आले. त्यातून आता डोंगरावर पर्यटक, भाविक, गुराख्यांसाठी पाण्याची उपलब्धता होणार आहे. या कामगिरीचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रात अभिनव क्रांती; महाबळेश्वरात फुलणार लाल-हिरव्या भाताची शेती!

कुशी गावाच्या सुळपणीवर कसे जाल..

कुशी गावाच्या पश्चिमेस सुळपणीचा डोंगर आहे. समुद्रसपाटीपासून १०९२ मीटर उंचावर हे ठिकाण आहे. आनेवाडी टोलनाक्याच्या थोडे अलीकडे गावाकडे जाणारा रस्ता आहे. तिथून सरळ असलेली पाऊलवाट डोंगराकडे जाते. वाटेत पहिली गवळण, दुसरी गवळण, पाझर तलाव, ससे पठार ही स्थळे लक्षवेधक आहेत. सुमारे तासाभराच्या चढणीनंतर मुख्य ठिकाणी पोचता येते. तिन्ही बाजूला डोंगर अन् मध्येच फणीच्या आकाराचा सुळका अशी इथली भौगोलिक रचना आहे. येथून मेरुलिंग, कण्हेर धरण, पेटेश्वर, यवतेश्वर, जरंडेश्वर या स्थळांचे दर्शन घडते. अजिंक्यतारा, कल्याणगड, चंदनगड, वंदनगड, वैराटगड हे किल्लेही दृष्टिक्षेपात येतात.

Citizens Cleaned The Ancient Water Tanks On Sulpani Hill Satara Marathi News

loading image
go to top