कर्तव्यदक्षतेचा एक कॉल ठरला ती जिवांचा आधार

Anil Kawade
Anil Kawade

नगर - कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडून कळत-नकळत अनेक चांगली कामे होतात. गडबड कितीही असो, आपल्या अंगी एक सिस्टीम बाणवली, की अनेक कामे सुकर तर होतातच;  परंतु अनेक प्रश्‍नही सुटतात, हे नुकतेच एका प्रसंगावरून दिसून आले. एक कार्यकर्ता व नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचा एक फोन एका मनोविकलांग गर्भवती महिला व तिच्या मुलीला हक्काचे घर देणारा ठरला.

गोष्ट आहे दसऱ्याच्या सुमाराची भगवानगडावर दसरा मेळाव्याचे आयोजन चालले होते.  होता.  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेला गडावर परवानगी द्यायची की पायथ्याशी यावरुन मोठी गडबड सुरू होती. त्यामुळे जिल्हाधिकारी अनिल कवडे तेथेच ठाण मांडून बसले होते. मुख्यमंत्री, विविध खात्याचे मंत्र्यांचे फोन तर कधी वरिष्ठ सर्व मंडळींचे फोनवर फोन येत होते. अशातच एका कार्यकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. त्याने  त्यांचा नंबरही इंटरनेटवरून शोधला होता. फोनवरून कार्यकर्त्याने सांगितले, "साहेब, बाभळेश्‍वर (ता. राहाता) येथील एका चौकात एक गरोदर व मनोविकलांग असलेली महिला तिच्या तीन वर्षाच्या मुलीला घेऊन फिरतेय. अक्षरशः कुत्र्यासारखं गळ्यात बांधून ती त्या चिमुरडीला घेऊन जात आहे. त्या महिलेसाठी व मुलीसाठी कुठेतरी आसरा मिळेल, असे काहीतरी करा.'' 

समोर मोठी धावपळ असतानाही कवडे यांनी तातडीने आपल्या स्वीय सहाय्यक सुरेश आघाव यांना फोन करून ही माहिती दिली. तातडीने माऊली सेवा प्रतिष्ठानच्या डॉ. राजेंद्र धामणे यांना ही माहिती सांगा व महिलेची मदत करा, असे फर्मान काढले. आघाव यांनी तातडीने डॉ. धामणे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली. शिंगवे (ता. नगर) येथे माऊली प्रतिष्ठान ही संस्था आहे. 110 मनोविकलांग महिला व त्यांची 17 लहान चिमुरड्यांचा ती सांभाळ करते. सरकारच्या कोणत्याही अनुदानाशिवाय त्यांचे हे काम सुरू आहे. बेवारस महिलांचा सांभाळ करणाऱ्या या संस्थेचे सर्व कामकाज "माऊली'चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे हे दाम्पत्य पाहतात. 

आघाव यांच्याकडून ही माहिती मिळताच दोघांनीही तातडीने अॅम्ब्युलन्स घेऊन संबंधित महिला व मुलीला ताब्यात घेतले. संस्थेत आणून तिच्यावर उपचार सुरू केले. ती साडेआठ महिन्याची गरोदर असल्याचे लक्षात आले. मनोविकलांग असल्याने गेल्या काही वर्षांपासून ती रस्त्यावर भटकत होती. घराचा पत्ता सांगता येत नव्हता. गंभीर मानसिक आजार असल्याने तिच्या घरच्यांनी तिला सोडून दिले होते. रस्त्यावर अनेकांकडून अत्याचार सहन करीत ती गर्भवती राहिली होती. "माऊली'मध्ये आल्यानंतर तिच्यावर योग्य उपचार सुरू झाले. चिमुरडीही इतर बालगोपाळात रमली. या महिलेला व तिच्या चिमुरडीला हक्काचे घर मिळाले.

गेल्याच  आठवड्यात ही महिला प्रसुत झाली. उलट्या बाजुने आलेले व नाळेचे अनेक वेढे गळ्याभोवती असणारे हे बाळ होते. अत्यंत परीक्षा पाहणारी ही प्रसुती डॉक्‍टरांचाही घाम काढणारी ठरली. हे नवजात अर्भक आपल्या मातेसोबत आणि बहिणीसमवेत आता "माउली'च्या छत्रछायेत सुखरूप आहेत. ती महिला विदर्भातील असल्याचे कळते. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर झालेल्या अत्याचारातून तिला दोन बालके झाली. कसे झाले, काय झाले, हे तिला अद्यापही सांगता येत नाही. पण आता ती चांगले बोलू लागली आहे. "माऊली'च्या रुपाने हक्काचे घर मिळाले. एका कार्यकर्त्याची व एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची तत्परता तीन जिवांना वाचवू शकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com