नवदाम्पत्यासह १९ जणांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

शशिकांत जामगडे
बुधवार, 9 मे 2018

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) - नवदाम्पत्य व कुटुंबातील सोळा व्यक्तींसह एका मित्राने विवाहानिमित्त मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. यानिमित्ताने त्याने येथील बैस्कार कुटुंबीयांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) - नवदाम्पत्य व कुटुंबातील सोळा व्यक्तींसह एका मित्राने विवाहानिमित्त मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. यानिमित्ताने त्याने येथील बैस्कार कुटुंबीयांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

येथील ग्रीनपार्कमधील रहिवासी व श्रीरामपूर केंद्राचे केंद्रप्रमुख, राज्य शिक्षक पुरस्कारप्राप्त निवृत्तिनाथ बैस्कार यांचा एकुलता एक शिक्षक असलेला मुलगा व एकनाथ मोझरकर यांचा नातू विवेक यांचा विवाह भुसावळ (जि. जळगाव) येथील रामहरी मोहळे यांची सुकन्या शुभांगीशी रविवारी (ता.६) शेगाव (जि. बुलडाणा) येथे झाला. मुळातच बैस्कार कुटुंबीय हे गुरुदेव सेवा मंडळ, विवेकानंदांचे रामकृष्ण मठ (मिशन) यांचे समर्थक व विचारांचे प्रचारक. विवेकानंदांचे विचार ते शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, युवक-युवतींपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत असून, त्यांच्या कुटुंबावर स्वामी विवेकानंद व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यामुळे समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेने विवाहप्रीत्यर्थ पुसद येथील राधाकृष्ण लॉन येथे सोमवारी (ता. ७) आयोजित स्वागत समारंभात विवेक व शुभांगी यांनी जमलेले समाजबांधव, मित्रमंडळी, शुभचिंतक व उपस्थितांसमोर मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प जाहीर केला. नवदाम्पत्यांच्या या संकल्पाला कुटुंबातील १६ सदस्यांनीही व एका मित्राने साथ दिली. त्यामुळे यावेळी एकूण १९ जणांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करून एक आगळा-वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला.

Web Title: couple eye donation resolution motivation