गिनेस वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये दीपेश करमोडाची नोंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

डहाणू - जिल्हा परिषदेच्या गोवणे (ता. डहाणू) येथील शाळेतील दीपेश रामचंद्र करमोडा (सहावी, वय 11; मु. पो. साखरे) या आदिवासी विद्यार्थ्याने "फास्टेस्ट टू अरेंज अल्फाबेट्‌स' या प्रकारात वर्गशिक्षकाचा 28.45 सेकंदांचा विक्रम मोडून 26.30 सेकंदांचा नवा विश्वविक्रम "गिनेस वर्ल्ड रेकॉर्डस'मध्ये नोंदवला आहे. असा विक्रम करणारा दीपेश हा जिल्हा परिषद शाळेत शिकणारा देशातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.

विजयचे वर्गशिक्षक विजय पावबाके यांनी याच प्रकारात नोव्हेंबरमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना या विक्रमाची माहिती देऊन जिद्द व प्रयत्नाद्वारे तुम्हीही हा विक्रम मोडू शकता, असा आत्मविश्‍वास त्यांच्यामध्ये तयार केला. मुलांना हे सर्व खूप वेगळे व आव्हानात्मक वाटत होते; पण दीपेश, अनिल, आकाश व प्रशांत या विद्यार्थ्यांनी ते आव्हान स्वीकारले. वर्गशिक्षकांनी त्यांना आवश्‍यक साहित्य आणून दिले आणि योग्य मार्गदर्शन करून घरी सराव करण्यास सांगितले. सरावादरम्यान दीपेशने 27 सेकंदांत ही क्रिया (ऍक्‍टिव्हिटी) पूर्ण केली. सरावासाठी त्याचा मोठा भाऊ गुलशन व बहिणींनी त्याला मदत केली. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दीपेशच्या या रेकॉर्डचे शूटिंग करण्यात आले. दीपेशचा सराव एवढा होता, की पहिल्याच प्रयत्नात त्याने वेग व अचूकता यांचा योग्य मेळ साधत अवघ्या 26.30 सेकंदांमध्ये ही क्रिया पूर्ण केली. सर्व आवश्‍यक सोपस्कार पार पडल्यानंतर बुधवारी (ता. 28) दीपेशची गिनेसमध्ये नोंद झाल्याचे जाहीर करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dahanu mumbai news grinich world record dipesh karmoda fastest to arrange alphabets