दुग्ध व्यवसायातून मिळविली समृद्धी

सुषेन जाधव
रविवार, 8 जानेवारी 2017

तिघा मित्रांनी सुरू केली रॉयल डेअरी, बेरोजगारांसाठी ठरले प्रेरणावाट

तिघा मित्रांनी सुरू केली रॉयल डेअरी, बेरोजगारांसाठी ठरले प्रेरणावाट
औरंगाबाद - दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या व्यवसायामुळे राज्यातील काही भागांत शेतकरी आत्महत्या घटल्याचेही चित्र आहे; मात्र शेतमाल उत्पादनाव्यतिरिक्त दुग्ध व्यवसाय हा स्वतंत्र व्यवसाय कसा होऊ शकतो, हे वास्तवात उतरवून दाखविले आहे तीन मित्रांनी. एवढेच नाही तर ते बेरोजगारांसाठी प्रेरणावाट बनले आहेत.

हे तिघे आजघडीला 220 पैकी 90 ते 96 म्हशींपासून रोज तब्बल 900 लिटर दूध संकलन करून त्याची विक्री करतात. हा कारभार शाहीद अहमद सांभाळतात. शाहीद अहमंद हे मूळ औरंगाबादचे. जेएनइसीमधून इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी काही काळ पुण्यात नोकरी केली. त्यानंतर थेट कुवैतध्ये (आखाती देशात) गेले. त्या ठिकाणी त्यांची कुंजू मोहम्मंद, एन. व्ही. अन्सार (केरळ) यांच्याशी भेट झाली. तिथे त्यांनी व्यवसाय करण्याचे प्रयत्न केला; पण भांडवलाअभावी त्यात यश आले नाही. या परिस्थितीत शाहीद यांनी औरंगाबादला येऊन कोचिंग क्‍लास सुरू केले. मात्र, त्यात ते रमले नाहीत. दरम्यान, कुंजू मोहम्मंद आणि एन. व्ही. अन्सार हेसुद्धा औरंगाबादला आले. त्यानंतर सुरू झाला प्रवास तो रॉयल डेअरी फर्मचा.

असा बहरला व्यवयाय
या तिघांनी मिळून देवपुडी (ता. कन्नड) येथे साडेचार एकर जमीन घेतली. गुजरात येथून जाफ्राबादी म्हशी आणल्या आहेत. याव्यतिरिक्त 20 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन त्यांनी त्यात आफ्रिकन टॉल, फुले, जयवंत सारख्या गवताची लागवड केली. म्हशींच्या व्यवस्थापनासाठी खास मजूरही ठेवले आहेत. दिवसाला 22 हजार लिटर म्हशींसाठी पाणी लागते.

फॅटस्‌ तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान
म्हशींच्या व्यवस्थापनासाठी प्रति 10 म्हशींमागे दूध काढणे, तिचे आरोग्य सांभाळणे आदी काम एक मजूर पाहतो. एक म्हैस साधारण 10 ते 18 लिटरपर्यंत दूध देते. यानुसार त्या म्हशीच्या दुधातील फॅटस्‌ बघून तिला चारा दिला जातो. म्हशींच्या दुधातील फॅटस्‌ (एसएनएफ) नुसार 50 ते 60 रुपये प्रति लिटर असा भाव मिळत आहे. हे फॅटस्‌ तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मशीनही आहे.

पौष्टिक चाऱ्यासाठी सरकी पेंढ निर्मिती यंत्र
पौष्टिक चारा म्हणून दूध देणाऱ्या म्हशीसाठी सरकी पेंड तयार करणारे यंत्र आणले असून, त्यातून पेंड अणि सरकी तेल असा दुहेरी फायदा मिळत आहे. परंतु, असे असले तरी सरकीचे भाव वाढले आहेत. त्याचबरोबर उसाचेही भाव वाढल्याने हे दर पडवणारे नाहीत. त्यामुळे दुधाचे भाव वाढत नाहीत तोपर्यंत तोटाही सहन करावा लागत असल्याची खंतही शाहीद यांनी व्यक्त केली.

स्वतः केली विक्री
दुग्ध व्यवसाय सुरू केल्यांनतर सुरवातीला उधारीवर दूध विकले. यातून बराच पैसा मार्केटमध्ये राहू लागला. त्यानंतर त्यांनी रॉयल डेअरी नावाने औरंगाबाद शहरात स्वतःच्या दोन डेअरी सुरू केल्या. त्यामुळे रोजचे दूध हे हातोहात विकले जाते.

गाभण म्हशींचाही सांभाळ
मराठवाड्यात ज्या-ज्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय केला जात आहे. त्यापैकी बहुतांश ठिकाणी गाभण म्हशींना सांभाळले जात नाही; मात्र शाहीद यांनी तब्बल 120 गाभण म्हशींचा सांभाळ केला आहे. तसेच एकदा व्यालेली म्हैस शेतकरी सांभाळत नाहीत; परंतु शाहीद यांनी तब्बल चार ते पाच वेळेस व्यालेल्याही म्हशींचा सांभाळ केला आहे.

Web Title: Dairy business gained wealth