जिद्दीच्या जोरावर आयुष्याशी "दोन हात'

सुवर्णा चव्हाण
सोमवार, 12 डिसेंबर 2016

अनेकांनी माझी जिद्द पाहून मदतीचा हात दिला. कृत्रिम हातही बसण्यासाठी विचारणा केली. हातांविना जगण्याची सवय झाली आहे. कारण 75 वर्षांपर्यंतचा मोठा प्रवास पार केला आहे. त्यामुळे आता हात बसवून फायदा नाही. एक सक्षम मदतीची गरज आहे. पुढील आयुष्याला आधार मिळावा यासाठीची मदत मिळावी हीच समाजाकडून अपेक्षा आहे.
- सुंदराबाई गंगावणे

पुणे : उसाच्या चरख्यात हात गेल्याने बाराव्या वर्षी हात गमवावे लागले... आज या घटनेला तब्बल 63 वर्षे उलटली. या प्रवासात संघर्ष होता तरी त्या डगमगल्या नाहीत. दोन्ही हात नसल्याचं रडगाणं न गाता लढल्या, हातांविना जगल्या अन्‌ स्वतःला सावरून महिला व्यावसायिक बनल्या. सुंदराबाई गंगावणे यांची ही प्रेरणादायी कहाणी. आधी केळी विकणाऱ्या सुंदराबाई आता हातांविनाही पानटपरी चालवतात. पानटपरीत गिऱ्हाइकांना सामान देण्यापासून ते पैशांचे व्यवहारही त्या करतात. जिद्दीचा हा प्रवास गेली 75 वर्षे उलटूनही अविरत सुरू आहे.

काहीही नसताना सुंदराबाई यांनी स्वबळावर मिळवलेल्या या यशाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. उदरनिर्वाहासह स्वाभिमानी जगण्याची जिद्द त्यांना वाटचालीसाठी प्रेरित करत असते.
मूळच्या शिरूरच्या असलेल्या सुंदराबाई या शिकलेल्या नाहीत. अवघ्या सातव्या वर्षी त्याचं लग्न झालं. सासरी नांदायला जाण्यापूर्वीच 12 वर्षांच्या असताना, त्यांचे हात उसाच्या चरख्यात गेले. त्यांना अपंगत्व आलं आणि सासरच्यांना त्यांना न नांदावायचं निमित्त मिळालं. अशा वेळी आई-वडिलांच्या घरी राहताना लहानपण बिगारी कामात गेलं. कळत्या वयात जगानं भीक मागण्याचा सल्ला दिला; पण त्यांना स्वाभिमानानं जगायचं होतं. त्यामुळे त्यांनी केळी विकायला सुरवात केली. त्यांच्या या छोट्या व्यवसायाला चिकाटीची जोड मिळाली अन्‌ त्यांचा व्यवसाय यशस्वी ठरला. अपंगत्वाला बाजूला सारून लढणाऱ्या सुंदराबाईच्या जिद्दीला 1995 साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांची जिद्द पाहून 30 वर्षांपूर्वी त्यांना महापालिकेकडून शिवाजीनगर येथे दुकान मिळाले. त्याच दुकानात त्यांनी पानटपरी सुरू केली आहे.

याबाबत सुंदराबाई म्हणाल्या, ""मला हात नाहीत याचं जगाला खूप आश्‍चर्य वाटतं व कुतूहलही. पण, हात नसले तरी मला जगण्याचा हक्क आहे आणि तो मी स्वाभिमानानं पेलत आहे. मी सकाळी पानटपरी सुरू करते व सायंकाळी बंद करते. सध्या मी भाच्याकडे जनवाडीत राहते. माझ्यासोबत रोज माझे नातू पानटपरीवर मदतीसाठी येतात. संघर्षाला कंटाळण्यापेक्षा जिद्दीनं तोंड दिलं की सर्वकाही सोपं होतं. त्यात हात नसले तरी काय झालं?''
 

Web Title: Determination and strength of life "two hands'