जिद्द राष्ट्रीय स्तराची; अडचण पैशाची

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

मालवण - राज्यस्तरीय ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविलेल्या ताराचंद सुनील पाटकर या वायरी येथील युवकाला आता राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्‍यकता आहे. मोलमजुरी करून कुटुंब चालविणाऱ्या या विद्यार्थ्याला अनेकांनी सहकार्य करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले होते, मात्र आता राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याला सुमारे २० हजाराची आवश्‍यकता आहे. यासाठी ताराचंद याने सहृदयींकडे सहकार्याचे आवाहन केले आहे.

वायरी येथील रहिवासी असलेला ताराचंद हा कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात तृतीय वर्ष कला शाखेत शिक्षण घेत आहे. कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्याने स्कुबा व्यवसायात सुटीच्यावेळी मार्केटिंग करून तो आपले शिक्षण पूर्ण करत आहे. नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या दुसऱ्या पीपल ऑलिंपिक राज्यस्तरीय ॲथलेटिक्‍स स्पर्धेत त्याने सहभाग घेत खुल्या गटात ४०० मीटर धावणेमध्ये सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याला त्याच्या सहकारी मित्रांनी आर्थिक मदत केली होती. आता राष्ट्रीय स्पर्धा २० ते २२ जानेवारी या कालावधीत होत आहे. यासाठी त्याला सुमारे २० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र घराची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला सहभाग घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्याला मुख्य प्रशिक्षक समद शेख व तेजस्वी नाईक यांनी प्रोत्साहन दिले आहे. यामुळे त्याने राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्याचे निश्‍चित केले आहे. त्याला आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क साधावा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Determination national level; money problem