जिल्हा परिषद शाळा होताहेत डिजिटल

जिल्हा परिषद शाळा होताहेत डिजिटल

जळगाव  - जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत १,८४२ शाळांपैकी सुमारे २१२ शाळा डिजिटल शिक्षणासंबंधी कार्यरत झाल्या आहेत. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुमारे ५० लाखांवर खर्च झाला आहे. डिजिटल शिक्षणासंबंधी शाळांमध्ये कार्यवाही सुरू आहे. परंतु, या शाळांना वीजजोडणीची गरज आहे.

मागील तीन वर्षांपासून डिजिटल शाळांचा कार्यक्रम गतीने सुरू आहे. सर्वप्रथम सावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शाळा शिक्षकांच्या पुढाकाराने डिजिटल झाली. त्यासाठीचा खर्च शाळेतील शिक्षक आणि लोकसहभागातून झाला. विद्यार्थ्यांना ४० टॅब देण्यात आले. दप्तराची आवश्‍यकताच नाही, अशी व्यवस्था या शाळेतील शिक्षकांनी केली. टॅबमध्येच सर्व दिलेला अभ्यासक्रम केला. तसेच, पहिली आयएसओ शाळा म्हणूनही या शाळेने लौकिक मिळविला. ग्रामस्थांच्या मदतीने या शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी (आरओ), वाचनालय, शाळेत आवश्‍यक सर्व भौतिक सुविधा, शैक्षणिक साहित्यही  उपलब्ध झाले. बारा लाख रुपये निधी या शाळेतील शिक्षक आणि ग्रामस्थांनी गोळा केला. जिल्ह्यात या शाळेचे कौतुक झाले. अनेक शिक्षक, अधिकारी या शाळेला भेट देतात. सावखेडा खुर्द येथील एकही विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी गावातून स्थलांतरित झालेला नाही. कारण गावातच इंग्रजी माध्यमाच्या शाळेपेक्षा अधिक गुणवत्तापूर्ण काम सुरू आहे. या शाळेची ७५ पटसंख्या आहे. चौथीपर्यंत वर्ग असून, शिक्षक अरुण चौधरी, प्रवीण चौधरी व किरण सपकाळे यांनी या कामासंबंधी सातत्य ठेवले आहे.

जिल्हा परिषदेचा निधी 
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सावखेडा खुर्द शाळेचे मॉडेल इतर शाळांनी आत्मसात करण्यासाठी अजेंडा हाती घेऊन डिजिटल कार्यक्रमावर भर दिला. यानंतर २०१६ मध्ये जिल्हा परिषदेने डिजिटल शाळांबाबत कार्यवाही केली. डिजिटल शाळांना संगणक, प्रोजेक्‍टर, ई-लर्निंग साहित्य देण्यात आले. तत्कालीन सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी या कार्यक्रमासंबंधी आणखी काही बदल सुचविले. ज्या शाळांची पटसंख्या अधिक आहे, त्या शाळा व जिल्हाभरातील केंद्र शाळांना डिजिटल शाळांबाबतचे साहित्य खरेदीसाठी जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिला. 

जेथे डिजिटल शाळा सुरू झाल्या, तेथे मध्यंतरी व्यावसायिक दराने वीजबिल येत होते. व्यावसायिक बिले भरायला अधिकचा निधी ग्रामपंचायतीला खर्च करावा लागायचा. जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभा, शिक्षण समितीच्या सभांमध्ये शाळांना घरगुती दरात वीज उपलब्ध करावी, अशा आशयाचा ठराव केला. तो वीज कंपनी, शासन यांना सादर केला. यावर आता शाळांना घरगुती दरात वीज देण्याचा निर्णय झाला आहे. परंतु अनेक शाळांना वीजजोडणीची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात एकूण १,८४२ शाळा जिल्हा परिषदेच्या असून, एवढ्या शाळांना डिजिटल करण्यासाठी पुरेसा निधी नाही. यासंदर्भात ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे, त्या शाळांनी लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे.  मुक्ताईनगर तालुक्‍यातील कोथळी, रुईखेडा येथील शाळांमध्येही लोकसहभाग, शिक्षक यांच्या मदतीने डिजिटल शाळांबाबत सकारात्मक कार्यवाही झाली आहे. आजघडीला प्रत्येक तालुक्‍यात १५ शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. 

ग्रामस्थांची मदत मोलाची...
आम्ही लोकसहभागातून २०१५ मध्ये डिजिटल क्‍लासरूम संकल्पनेवर काम केले. त्यात यश मिळविल्यानंतर आयएसओ शाळा संकल्पना राबविली. शाळेतील विद्यार्थ्यांना ड्रेस कोड आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेपेक्षा अधिक गुणवत्तापूर्ण कार्यवाही आमच्या शाळेत सुरू आहे. ग्रामस्थांनी त्यासाठी मदत केली. 
- अरुण चौधरी, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, सावखेडा खुर्द (जि. जळगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com