महिला दिन 2019 : कोपरखैरण्यातील डॉक्‍टरांनी घडवल्या रुग्णसेविका 

शुभांगी पाटील
शुक्रवार, 8 मार्च 2019

युवतींचा सहभाग वाढवण्यासाठी... 
सध्या परिचारिकांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात अनेकांना जीवनदान देणाऱ्या रुग्णसेविका घडवून युवतींना स्वावलंबी करण्याबरोबरच परिचारिका क्षेत्रात युवतींचा सहभाग वाढावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. 

महिला दिन 2019  तुर्भे  - रुग्ण सेवा ही ईश्‍वर सेवा आहे, असा ध्यास घेऊन अनेक डॉक्‍टर आज त्यांचे कार्य करत आहेत; पण त्याच्याही एक पाऊल पुढे टाकून कोपरखैरण्यातील एक डॉक्‍टर रुग्णसेविका घडवत आहेत. डॉ. विजया तांबे असे त्यांचे नाव आहे. नवी मुंबईतील नव्हे तर ठाणे, डहाणू, पालघर, भिवंडी, बदलापूर अशा लहान-मोठा गावांतील तब्बल 225 पेक्षा अधिक महिलांना त्यांनी परिचारिका प्रशिक्षण देऊन स्वावलंबी केले आहे. 

समाजातील उपेक्षित, वंचित आणि दुर्बलांच्या सेवेसाठी निःस्वार्थपणे उभे आयुष्य झोकून देऊनही डॉ. विजया तांबे यांना अहंपणाचा वारादेखील स्पर्श करू शकला नाही. मूळच्या अहमदनगरमधील त्या आहेत. लग्नानंतर त्या पती डॉ. प्रतीक तांबे यांच्यासमवेत 1998 मध्ये नवी मंबईत वास्तव्यास आल्या. महाराष्ट्राची प्रगत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातील महिलांना त्यांनी नर्सिंग प्रशिक्षण देण्यासाठी आदित्य हेल्थ ऍण्ड एज्युकेशन सोसायटीची 2007 मध्ये स्थापना केली. डॉ. विजया तांबे प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या संस्थापिका आहेत. आदित्य एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सुरू झालेली ही आरोग्याची सेवा पुढे अधिकच बहरली. 2010 मध्ये एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून प्रतिभा इन्स्टिट्यूट ऍण्ड नर्सिंग या नर्सिंग कॉलेजची स्थापना करण्यात आली. भारतीय परिचारिका परिषद (नवी दिल्ली), महाराष्ट्र परिचार्या परिषद (मुंबई) आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता संस्थेला आहे. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परिचारिका प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थिनी आजही मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि पालघर जिल्हा आदी ठिकाणी शासकीय, निमशासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये यशस्वीपणे रुग्ण सेवेचे कार्य करीत आहेत. 

डॉ. विजया तांबे आणि डॉ. प्रतीक तांबे यांची ओळख केवळ डॉक्‍टर नसून एक शिक्षण सहकारी मित्र म्हणूनदेखील आहे. ग्रामीण भागात डॉ. विजया तांबे यांचा जन्म झाल्याने त्यांनी अधिक गांभीर्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. अनेक मुलींच्या नर्सिंगचा खर्च, त्यांचा हॉस्टेलचा खर्च त्या करतात. 

युवतींचा सहभाग वाढवण्यासाठी... 
सध्या परिचारिकांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात अनेकांना जीवनदान देणाऱ्या रुग्णसेविका घडवून युवतींना स्वावलंबी करण्याबरोबरच परिचारिका क्षेत्रात युवतींचा सहभाग वाढावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Vijaya Tambe trained women for nurse