पिकांच्या पाण्याने भागवली गावाची तहान

कोन्हेरी - शेतकरी अण्णासाहेब शेटे यांनी स्वतःच्या शेतीच्या पाण्यातून गावकऱ्यांसह जनावरांच्या पाण्याची केलेली सोय.
कोन्हेरी - शेतकरी अण्णासाहेब शेटे यांनी स्वतःच्या शेतीच्या पाण्यातून गावकऱ्यांसह जनावरांच्या पाण्याची केलेली सोय.

मोहोळ (जि. सोलापूर) - ऐन दुष्काळी परिस्थितीमध्ये स्वतःच्या शेतातील ऊस, कडवळ ही पिके पाण्याविना जळत असूनही कोन्हेरी (ता. मोहोळ) येथील शेतकरी अण्णासाहेब विष्णू शेटे यांनी गावकऱ्यांसाठी दररोज 75 हजार लिटर पाणी उपलब्ध करून दिले आहे. गावकरी व जनावरांबरोबरच गावातील विवाह सोहळ्यासाठीदेखील शेटे पाणी उपलब्ध करून देतात. हा उपक्रम दसऱ्यापासून सुरू आहे.

अण्णासाहेब शेटे म्हणाले, की कोन्हेरीतील मी मध्यम शेतकरी. गेल्या पाच महिन्यांपूर्वी कोन्हेरीची ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्या वेळी प्रचारादरम्यान मी निवडून आलो व नाही आलो तरीही गावाला मोफत पाणीपुरवठा करणारच, असा शब्द दिला होता. योगायोगाने गावकऱ्यांनी मला निवडून दिले. गावापासून शेत जवळच आहे. शेतात पाण्यासाठी हौद बांधला आहे. त्या हौदात विहीर व कूपनलिकेचे पाणी सोडले जाते.

गावच्या पाणीपुरवठ्यासाठी स्मशानभूमीत सरकारने पाण्याची टाकी बांधली आहे. त्या टाकीपर्यंत स्वखर्चाने अडीच हजार फूट जलवाहिनी टाकून शेतातील हौदातून टाकीत पाणी सोडले आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह जनावरांची पाण्याची मोठी सोय झाली आहे. यात कुटुंबातील सदस्यांची मोठी साथ आहे. बाजार समितीचे संचालक रामचंद्र शेळके, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शेळके, सरपंच गणेश पांढरे यांची प्रेरणा मोठी असल्याचेही त्यांनी सांगितले.

समाजसेवेचा वारसा
मोफत पाणी देण्याची प्रेरणा वडील विष्णू शेटे यांच्यापासून मिळाली. पूर्वी विजेवर चालणारे पंप नव्हते, तेव्हा विहिरीतून पाणी वर काढण्यासाठी वडील इंजिनचा वापर करीत होते. स्वतःच्या खर्चाने त्यांनी त्याकाळात गावकरी व जनावरांच्या पाण्याची सोय केली होती. तोच वारसा आम्ही पुढे चालवत असल्याचे शेटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com