आला वाईल्डलाईफचा सिझन.....

शेखर नानजकर 
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016जय, विरू, पूछकटा, मछली... अरे वाघांना नावं काय ठेवताय? अगदी पेशवे पार्क सारखं वाटतं! कान्हा, बांधवगड, पेंच, रणथंबोर, जिम कोर्बेट... सगळीकडे तेच आणि तसंच! काहीतरी वेगळं हवं! जिथे खरं जंगल अनुभवता येईल... रेस्टहाउस मध्ये राहून, जीप मध्ये फिरून खरं जंगलं अनुभवता येईल? कधीच नाही! त्या संरक्षित वातावरणात खरा जंगलाचा फील येईल? खरं जंगलं कसं असतं तरी कसं? 
जंगलं ही एक अनुभूती आहे! 

आजच ढग जरासे हटले! स्वच्छ ऊन पडलं. आता लवकरच अत्यंत आनंदमयी दिवस! मग थंडीची चाहूल लागेल, आणि निसर्गप्रेमींची पावलं निसर्गाकडे वळतील! सगळे नेचर टूर ऑपरेटर्स आपापल्या तारखा जाहीर करून गिऱ्हाईकांची वाट बघत बसतील. आणि दिवाळी संपली रे संपली की एक मोठा लोंढा धरणाचा बांध फुटल्यासारखा निसर्गात घुसेल. मग तेच कान्हा, बांधवगड, जिम कॉर्बेट, रणथंबोर, ताडोबा वगैरे. आणि त्यात भर म्हणून आता लडाख, केनिया सफारी... 

मग हा सगळा शो नीट चालावा म्हणून तीन चार महिने ऍडव्हांस, खऱ्याखोट्या नावानं रेल्वे बुकिंग्स. त्यासाठी रेल्वे तिकीट बुकिंग एजंट्‌स. अगदी शेवटी शेवटी होणारं बुकिंग, त्यासाठी एखादा स्लाईड शो, एखादं फोटोग्राफी प्रदर्शन, त्यात दिसणारं सगळं तुम्हीही प्रत्यक्ष पाहू शकाल ही आशा! खर्च साधारणतः माणशी वीस हजाराच्या आसपास! एक परिवार म्हणजे आई, वडील, मुलगा, मुलगी मिळून साधारणतः पाउण लाख ते एक लाख! 

मग एक दिवस टूर सुरू. तो चोवीस तासांचा कंटाळवाणा रेल्वे प्रवास... तिथून पुढे एक खास गाडी अभयारण्याच्या आतपर्यंत! आत एक खास रूम; एसी असलेली. मग संध्याकाळी चहा बिस्किटांबरोबर आपण काय काय, कुठले प्राणी पाहणार या विषयी एखादा स्लाईड शो किंवा व्याख्यान.. रात्री सूप वगैरे सकट सुंदरसं जेवण... पहाटे पाचला उठणं, चकाचक तयार होऊन जिप्सी ची वाट पाहणं, मग ती जीप येणार, त्यात बसून जंगलात शिरणं... ते उत्सुक डोळे, त्या नवीन विकत घेतलेल्या दुर्बिणी, सारखा वाघ शोधणाऱ्या त्या शहरी नजरा.. मग चितळ, एखादं रानडुक्कर, सांबर, कोळसुनी, सर्प गरुड... आणि मग एखाद्या ठिकाणी एकदम गर्दी! 

पाचपंचवीस जीप आपल्या आणि समोरच्या बाजूला... एकमेकांवर कुरघोडी धरून पुढे पुढे जाणऱ्या जीप्स, अरे हटो... हमे भी देखणे दो...- वगैरे आवाज.. मग झाडीतून वाघ साहेब आवतरणार! आई, केवढा आहे... वगैरे नवखे आवाज... अरे हा वीरू... मागच्या वेळेला कोळश्‍यात पहिला होता... लोकांच्या आदराच्या नजरा... अय्या हो? तू किती वाघ पाहिलेस - एखादी सुबक ठेंगणी.. गडी खूष! तरी हल्ली वाघ कमी झालेत... पंचाण्णव साली मी ताडोबाच्या एका भेटीत सतरा वाघ पहिले होते... एक बुजुर्ग! आदराचं शिखर... तरण्याचा सेन्सेक्‍स डाऊन... दुसरा तरणा कॅमेऱ्याची तोफ काढतो... कच कच कच.... सगळी जीप खल्लास! अय्या, कुठला कॅमेरा आहे? सुबक ठेंगणी त्याच्याकडे... कामात फारच एकाग्र असल्यासारखं दाखवत त्याचं तिच्याकडे साफ दुर्लक्ष... नंतर आपला भाव वाढणार यावर ठाम! वाघ झाडीत... जीपा रेस्टहाउसकडे.... कॅमेरा वाल्याचं मार्केट अप... सुबक ठेंगणी, तिच्या मैत्रिणी वगैरे... मेल आयडी देणं घेणं वगैरे.. 

पुणे ते पुणे सहा दिवस, माणशी अठरा ते वीस हजार खर्च करून, मोबाईलच्या कॅमेऱ्यातून किंवा नवीन घेतलेल्या एम and शूट कॅमेऱ्यातून; किंवा आई बाबांचं कॉलेजचं, नवथर लाडकं बाळ असेल तर एस एल आर; वगैरे कॅमेऱ्यांतून पाचपंचवीस चितळांचे, एखादा सांबराचा आणि कळस म्हणजे फोटोत ठिपक्‍यासारख्या दिसणाऱ्या वाघाचा फोटो घेऊन पुण्यात परत... फेसबुकवर अपलोड केलं की नुसते लाईक.... पैसे खर्च झाले विषय संपला. आता फक्त स्टोऱ्या.....! 

खरं सांगू का? या प्रकारच्या टूरिझमचा मला जाम कंटाळा आला आहे! पहिल्यांदा मी 1993 साली कान्हाला टूर घेऊन गेलो होतो. तीच ती पानगळी जंगलं, तीच ती रेस्ट हाऊसेस, त्याच त्या जीप्सीज, तेच ते गाईड्‌स, तीच चितळे, सांबरं, भेकरं, कोल्हे, रानकुत्री.... तीच ती वाघांची नावं... जय, विरू, पूछकटा, मछली... अरे वाघांना नावं काय ठेवताय? अगदी पेशवे पार्क सारखं वाटतं! कान्हा, बांधवगड, पेंच, रणथंबोर, जिम कोर्बेट... सगळीकडे तेच आणि तसंच! 
काहीतरी वेगळं हवं! जिथे खरं जंगल अनुभवता येईल... रेस्टहाउस मध्ये राहून, जीप मध्ये फिरून खरं जंगलं अनुभवता येईल? कधीच नाही! त्या संरक्षित वातावरणात खरा जंगलाचा फील येईल? 

खरं जंगलं कसं असतं तरी कसं? 

जंगलं ही एक अनुभूती आहे! 

जंगलातून आल्यावर किती प्राणी दिसले, असा एक सर्वसामान्य प्रश्न विचारला जातो. पाचसात वाघ, एखादा बिबट्या, पाचदहा सांबरं, तितकीच भेकरं, शे दोनशे चितळं, रानडुक्कर, रानकुत्री वगैरे पाढा वाचला की समोरच्या माणसाच्या चेहेऱ्यावर आदराचा भाव दिसू लागतो. आणि एखादं उदमांजर, मुंगूस, एखादा साप, सरडा, सुरवंट, एखादा कोष वगैरे असं सांगितलं की त्याच्या चेहेऱ्यावर "अरे अरे पैसे वाया घालवले', असा भाव दिसू लागतो! प्राणी दिसले तरच जंगलं पाहिलं, असा एक सर्वसाधारण समज आहे. 

मला अनेकदा चारचार दिवस जंगलात राहून एकही मोठा प्राणी दिसलेला नाही! जंगलात गेलं की प्राणी दिसायलाच पाहिजेत हा कुठला नियम आहे? ती काय सर्कस आहे? का जंगलं पहायला गेलेले आपण प्राण्यांचे "व्हीआयपी' आहोत; की सगळ्या प्राण्यांनी एका ओळीत आपल्याला सलामी द्यायलाच हवी? कारण आपण पैसे खर्च करून, वेळ काढून आलोयत म्हणून? तेव्हा प्राणी पाहणं म्हणजेचं फक्त जंगलं अनुभवणे नव्हे. तो एक भाग आहे. जंगलाचा मूळ ग्रंथ खूपच विशाल आहे. आणि तो वाचायचा तर त्याचे स्वत:चे काही नियम आहेत, काही तत्त्वं आहेत, काही पथ्यं आहेत. 

पतंजली योग सूत्राच्या समाधीपदातल्या पहिल्या अध्यायाची सुरुवात पतंजली ऋषींनी "अथ योगानुशासनम' अशी केली आहे. त्याचं निरुपण करताना भगवान रजनीशांनी अथ या शब्दाची फोड अडीच पानं केली आहे. ओशो म्हणतात, जिथे जीवनाच्या सर्व आशा, आकांक्षा, नातीगोती, चढाओढी, लालसा, इच्छा सगळं सगळं संपतं, तिथून पुढे योगाला सुरुवात होते! जोपर्यंत यातलं काहीही शिल्लक असतं, तोपर्यंत योगाची सुरवात सुद्धा होऊ शकत नाही! 

मला वाटतं जंगलाचंही असंच आहे. जेंव्हा गाड्या नसतात, मोबाईल नसतो, कुठेही चालतच जावं लागतं, ओढ्याचंचं पाणी प्यावं लागतं, जमिनीवरच झोपावं लागतं, डोंगरदऱ्या पार कराव्या लागतात, वाट शोधावी लागते, रात्री दिसेनासं झालं की पाखरासाराखं चिडीचूप झोपावं लागतं, हातानी करून खावं लागतं, अंघोळ वगैरे लाड पुरवता येत नाहीत, प्रत्येक क्षणी धोक्‍याची जाणीव होऊ लागरे, आवाज आपोआप कमी होतो, कान आजुबाजूच्या आवाजाचे वेध घेऊ लागतात, बिबट्यासारखा प्राणी आला, साप, विंचू चावला तर वाचावणारे कोणीही नाही, सूर्य अस्ताला गेला की सकाळ होण्याची वाट पाहण्यापलीकडे हातात काहीही नाही. कसले कसले आवाज येत आहेत ते कळत नाही, त्यात रात्री पाऊस आला तर? कुठंही माणूस दिसत नाही, आपण परत जाऊ का नाही याची खात्री नाही... 

असं सगळं घडतं तेंव्हा आपली शहरी नाळ तुटू लागते. निसर्गातलं आणि आपल्यातलं द्वैत संपू लागतं. आपण निसर्गाशी तादात्म्य पाऊ लागतो. तिथे असलेल्या निसर्गाचा, प्राणिसृष्टीचा आपणही एक भाग आहोत, त्याचं आणि आपलं जीवनमरण एकच आहे, मी म्हणजे कोणीतरी श्रीमंत, हुषार, कर्तृत्ववान वगैरे सगळं आपण विसरतो आणि निसर्गातल्या सगळ्या घटकांशी एका समान पातळीवर येतो, माझा पैसा, त्याचा दिमाख, समाजिक स्टेटस, राजकीय संबंध वैगैरेचा इथं काही उपयोग नाही असं जेंव्हा जाणवतं, तेंव्हा ही शहरी नाळ तुटायला सुरुवात होते! 

मग मागच्या काहीही आठवणी येत नाहीत. भविष्यासंबंधी विचार येत नाहीत. मागे असं घडलं होतं, किंवा पुण्यात गेल्यावर हे करायचं आहे, हे राहूनच गेलं वगैरे कसलेच विचार येत नाहीत. आपण भूत, भविष्य विसरून जातो आणि फक्त वर्तमानात जगू लागतो. हा किडा कुठला? हे झाडं कोणतं? ओढ्याला पाणी किती? हा आवाज कसला? चूल कशी पेटवणार? लकड ओली आहेत. मुंग्या चावल्या, वारा सुटलाय, ढग आले का काय? अश्‍या वर्तमानातल्या प्रश्नात जेंव्हा आपण गुंतून पडतो तेंव्हा आपली शहरी नाळ तुटू लागते. मग सुरू होतं, निसर्गाशी तादात्म्य - अद्वैत... 

असं तादात्म्य पावल्यावर कशी दिसते जंगलातली पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र? एक एक सांगणार आहे. कसं असतं जंगल, त्यातले ओढे, पाणवठे, प्राणी वाटा, मैदानं, गवत, करावी, झुडपं, राक्षसी वेली, झाडं, त्यातल्या ढोल्या, वारूळ.... एक एक पुढे येईलच! 

पण एक नक्की, आवडलं तर कळवत चला. विचारत चला. माहित असेल तर नक्की सांगेन. 

(लेखक प्रसिद्ध वन अभ्यासक आहेत) 

Web Title: to experience a forest is different than wild tourism