अपंग मुलीच्या जन्मानंतर केले कुटुंब नियोजन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जुलै 2016

जळगाव - मुलगी झाली हो...असे म्हणत मुलीच्या जन्माचे स्वागत केले. पण, जन्मत:च एक पाय आणि एका हातात अधूपणा. तरी देखील घराला वारसा असावा असा विचार देखील मनात न करता एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय बोरनार येथील देशमुख दाम्पत्याने घेतला. 

जळगाव - मुलगी झाली हो...असे म्हणत मुलीच्या जन्माचे स्वागत केले. पण, जन्मत:च एक पाय आणि एका हातात अधूपणा. तरी देखील घराला वारसा असावा असा विचार देखील मनात न करता एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय बोरनार येथील देशमुख दाम्पत्याने घेतला. 

"बेटी बचाव, बेटी पढाओ‘ हे शासनाचे धोरण आहे. तरी देखील स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण कमी होत नाही. अशा परिस्थितीतही एका मुलीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणारे देखील आहेत. यातच बोरनार येथील ज्ञानेश्‍वर सुभाष देशमुख व ज्योती देशमुख या पती- पत्नीने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. मुलीच्या जन्मानंतर कुलदीपक म्हणून मुलाच्या जन्माची वाट न पाहता कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेत जून 2014 मध्ये शस्त्रक्रिया करून घेतली. 

 

पत्नीही अपंग 

बोरनार येथील ज्ञानेश्‍वर देशमुख हा शेतमजुरी करणाऱ्या युवकाने अपंग ज्योतीसोबत 2010 मध्ये विवाह केला. अपंग पत्नीशी संसार सजविला. 2012 मध्ये ज्ञानेश्‍वर व ज्योती यांना पहिले कन्यारत्न झाले. सुरत महानगरपालिकेच्या रूग्णालयात प्रसूती झाली. परंतु, झालेले कन्यारत्न देखील अधू होते. एक हात आणि एका पायात अधूपणा आहे. 

सवलतीसाठी वणवण 

ज्ञानेश्‍वर देशमुख यांच्या वडिलांचे बीपीएल कार्ड होते. परंतु, त्यांच्या नावाचे बीपीएल कार्ड अद्याप मिळालेले नाही. तसेच एका मुलीवर कुटुंब नियोजन केल्यास शासनाकडून अनुदान स्वरूपात मदत मिळत असते. तसेच सुकन्या योजनेचा देखील लाभ घेता येणे शक्‍य आहे. परंतु, या साऱ्या गोष्टींपासून देशमुख कुटुंबीय अद्यापपर्यंत दूर असून, या सवलती मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. या सवलतींचा लाभ मिळण्याची अपेक्षा देशमुख कुटुंबीयांकडून केली जात आहे.

Web Title: Family planning and birth of a handicapped girl