मुंबईतील सिमेंटच्या जंगलात फुलतोय मळा

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

लालबागमधला हा सर्वात जुना हरित पट्टा आहे. गेडिया कुटुंबीयांची शेती हा मेघवाडीच्या अभिमानाचा विषय आहे. त्या शेतीला पूरक झाडे परिसरातील नागरिकांनी जतन केली. त्यामुळे या भागात सर्वात जास्त हिरवळ दिसते. कळायला लागल्यापासून माझ्या डोळ्यासमोर ही शेती आहे. 
- सोमदत्त वाल्मीकी, जुने रहिवासी 

मुंबई - मुंबईत औषधालाही मोकळा भूखंड शिल्लक उरलेला नाही. एकीकडे जुन्या इमारती पाडून तेथे टॉवर उभारले जात लालबाग परिसरात राहणारे गेडिया कुटुंबीय एकत्रितपणे तब्बल 100 वर्षांपासून दोन एकर शेती कसत आहेत. या कुटुंबातील पाचवी पिढीही मनापासून शेतीत मग्न आहे. 

लालबागमधील मेघवाडीत हा शेतमळा आहे. शेताला लागूनच गेडिया कुटुंबाचे परंपरागत घर आहे. आनंदजी गेडिया यांनी मेघवाडीत पाच ते सहा एकरावर शेती कसण्यास सुरुवात केली. त्या वेळी लालबागमधील तावडीपाड्यात ते शेती करत. त्यांच्या पश्‍चात मुलगा हरजीभाई यांनी शेती कसली. 1931च्या सुमारास या भागात पहिली चाळ बांधली गेली. त्यामुळे या दोन चाळींना "जुनी चाळ‘ असे म्हटले जाते. या चाळीत गिरणी कामगार राहू लागले. त्या वेळी महिना चार आणे भाड्याने खोल्या मिळायच्या. हरजीभाई यांच्या शेतात भेंडी, पालक, चवळी, मेथी, हिरवा आणि लाल माठ, राई, मोहरी, मुळा असा भाजीपाला तयार व्हायचा. मध्यंतरीच्या काळात तेथे भातशेतीही करण्यात आली. शेतीला पाणी मिळावे, यासाठी तीन विहिरी बांधण्यात आल्या. त्यापैकी शेताजवळची विहीर "जुळ्या‘ स्वरूपाची आहे. या तिन्ही विहिरी गेडिया कुटुंबीयांनी 1907 मध्ये बांधल्या. आच्छादन घातलेल्या या विहिरी आज संपूर्ण मेघवाडीची तहान भागवतात. आतून दरवाजे असणाऱ्या या विहिरी कधीही आटलेल्या नाहीत. 

हरजीभाई यांच्या शेतातील भेंडी, काकडी आणि टॉमेटोचा दर्जा पाहून ब्रिटिश सरकारने सहा-सात वेळा त्यांचा पदक देऊन गौरव केला. त्यांच्या पश्‍चात मुलगा प्रकाश, राजेंद्र, भरत व त्यांचे चुलतभाऊ प्रागजी आणि गोविंद यांनी ही शेती पिकवली. प्रकाश सिव्हिल कंत्राटदार आहेत. जवळच्या तावजीपाड्यातील शेती त्यांचे नातलग प्रवीण गेडिया कसत होते; 1975 मध्ये त्यांनी शेती करणे थांबवले. 

 मेघवाडीतील या शेतीचे नऊ भाग करण्यात आले आहेत. तेथे पिकवलेला भाजीपाला आसपासच्या परिसरात आणि छोट्या विक्रेत्यांना विकला जातो. त्यातून गेडिया कुटुंबीयांना वर्षाला साधारण पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळते. या सर्व भावंडांची मुले उच्च शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे शिक्षण घेत असतानाही प्रत्येक जण जमेल तेवढा वेळ शेतीसाठी देतो. 
 

ग्रीन झोन 
मुंबईतील तुरळक हरित पट्ट्यात या शेतीचा समावेश करण्यात आला आहे. महापालिकेच्या नोंदीत हरित पट्टा असलेल्या जमिनीच्या या तुकड्याचा कर गेडिया कुटुंबीय भरतात. त्यामुळेच अगदी मोक्‍याच्या जागी असलेल्या या भूखंडाकडे आजवर एकाही विकसकाची वाकडी नजर पडलेली नाही. 
 

शेती बनली अभ्यासाचा विषय 
गेडिया कुटुंबीयांची ही शेती विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय ठरली आहे. याच विभागात राहणारे प्राणीतज्ज्ञ नितीन वाल्मीकी यांनी 2001 पासून "मेघ ग्रीन‘ हा "बायोडायव्हर्सिसिटी‘ प्रकल्प हाती घेतला आहे. 
 

शेतीमुळे पक्षी-प्राण्यांची मांदियाळी 
मेघवाडीतल्या शेतीमुळे जवळपास 98 प्रकारचे पशु-पक्षी येथे येतात. त्यात 51 प्रकारचे पक्षी, 13 प्रकारचे कीटक, 9 प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश आहे. या पक्षांना आकर्षित करतील, अशी झाडे लावण्यात आली आहेत. या शेतीत जगातला सर्वात छोटा किंगफिशर म्हणून ओळखला जाणारा ओरिएंटल ड्राफ्ट किंगफिशर, बिल्योन क्रेक, कॅटर इग्रेट (छोटा बगळा), भारद्वाज, व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर, इंडियर रोकर, बार्न आऊल आदी पक्षी तेथे येतात. त्याशिवाय शेतात वुल्फ स्नेक (कवड्या), वर्म स्नेक, धामण अशा सापांचाही वावर आहे. शेतीला पूरक असे श्रू माऊस, बॅंडिकूट रॅट, फिल्म माईस आणि इंडियन बुलफ्रॉग, टॉड जातीचे बेडूकही आढळतात. परिसरातील जखमी खारींना नागरिक मेघवाडीत आणून सोडतात. इथले रहिवासी त्यांची काळजी घेतात. त्यामुळे खारींची संख्या लक्षणीय आहे.

Web Title: farm in mumbai