पेणमधील हातांची कर्जतमध्ये जादू 

संतोष पेरणे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

नेरळ - कर्जत तालुक्‍यातील सुपीक जमीन कलिंगड शेतीसाठी उपयुक्त असल्याने पेणमधील शेतकऱ्यांना नेहमीच आकर्षित करते. यंदाही पेण तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कर्जत तालुक्‍याच्या बेकरे गावातील शेतात कलिंगड शेती पिकवली आहे. आतून लालेलाल रंगाची व बाहेरून गर्द हिरवी असलेली ही कलिंगडे १० एकराच्या परिसरात चांगलीच बहरली आहेत.

नेरळ - कर्जत तालुक्‍यातील सुपीक जमीन कलिंगड शेतीसाठी उपयुक्त असल्याने पेणमधील शेतकऱ्यांना नेहमीच आकर्षित करते. यंदाही पेण तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कर्जत तालुक्‍याच्या बेकरे गावातील शेतात कलिंगड शेती पिकवली आहे. आतून लालेलाल रंगाची व बाहेरून गर्द हिरवी असलेली ही कलिंगडे १० एकराच्या परिसरात चांगलीच बहरली आहेत.

पेण तालुक्‍यातील तांबडशेत येथील शेतकऱ्यांनी सालाबादप्रमाणे यंदाही कर्जत तालुक्‍यात येऊन उन्हाळी शेती पिकवली आहे. बेकरे गावाच्या हद्दीत जनार्दन कराळे यांची १० एकर शेतीमध्ये कलिंगडाची लागवड केली आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये बेकरे गावात पोहचलेले पेण तालुक्‍यातील किशोर महादेव पाटील, कमलाकर बाळाराम म्हात्रे, हिरामण घारे आणि राम घरत यांनी शेतीमध्ये पाणी आणण्यापासून आळी पाडण्यापर्यंत सर्व कामे केली. बायर कंपनीचे आयेशा हे कलिंगडाचे बियाणे त्यांनी वापरले आहे. एक किलो बियाणाकरिता १४ हजार रुपये खर्च आला आहे. चारपैकी तीन शेतकऱ्यांनी प्रत्येकी तीन एकर शेतात २८ डिसेंबर २०१७ ला ही लागवड केली. या काळात शेतात चांगले पीक यावे म्हणून भरपूर पाणी आळ्यांमध्ये फिरवण्यात आले. हवामानातील वाढते बदल लक्षात घेऊन अनुभवाच्या जोरावर या शेतकऱ्यांनी पिकाच्या वाढीसाठी वेगवेगळी खते-औषधे वापरली. त्यांच्या या मेहनतीला यश आल्याचे दिसून येत आहे.

सध्या बेकरे येथील कराळे यांच्या शेतात कलिंगडाचे पीक भरघोस लगडले आहे. या फळाला चांगला भाव मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पेण येथून येऊन शेतावर झोपडी बांधून राहणाऱ्या या शेतकऱ्यांच्या श्रमाचे चीज होताना दिसत आहे. त्याचबरोबर या शेतकऱ्यांनी कलिंगड शेतात बांधावर काकडीचे पीकही घेतले आहे.

कर्ज काढून शेती
या प्रत्येक शेतकऱ्याला तीन एकर शेतात कलिंगडाचे पीक घेण्यासाठी जमिनीच्या मशागतीपासून शेतात पाच ते आठ किलो वजनाचे कलिंगडाचे फळ येईपर्यंतच्या प्रवासात ८० हजार रुपये खर्च आला आहे. त्यात बियाणे, मजुरी, पाणीवाटप, जमिनीची मशागत, कीटकनाशके यासाठी केलेल्या खर्चाचा समावेश आहे. ही शेती करण्यासाठी ३० ते ५० हजारांचे कर्ज त्यांनी राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून घेतले आहे.

सध्या शेतात कलिंगडाच्या वेलींना चांगला माल दिसत आहे. बाहेरून गर्द हिरवी आणि आतमध्ये लालेलाल असलेल्या या गोड फळांसाठी बाजारात चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा आम्ही धरून आहोत.
- कमलाकर म्हात्रे, शेतकरी 

Web Title: farmer Kamlakar Mhatre watermelon