आधुनिक शेतीच्या वाटा धुंडाळून रमेश बिराजदार झालेत ‘कोथिंबीर किंग’

जलील पठाण
गुरुवार, 21 मार्च 2019

पारंपरिक शेतीऐवजी योग्य नियोजन, मार्गदर्शन घेत कमी कालावधीतील पिके घेतली तर नक्कीच पदरात चार पैसे पडतात. अनेकजण फक्त नशीब, निसर्गाला दोष देण्यातच धन्यता मानतात. ‘तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या वृत्तीने शेती केली तर ती कधीच तोट्यात जात नाही.
- रमेश बिराजदार, शेतकरी

औसा - ‘रुळलेल्या वाटेवर चालण्यापेक्षा स्वतःची वेगळी वाट निर्माण करा, परिस्थितीमुळे हतबल होऊन बसण्यापेक्षा जगण्याचे पर्याय शोधा’ याप्रमाणे तपसे चिंचोली (ता. औसा) येथील शेतकरी रमेश बिराजदार यांनी ‘धनिया’त (कोथिंबीर) धन शोधून धनवान होण्याचा प्रयत्न केला आहे. रमेश बिराजदार यांनी केलेल्या कोथिंबिरीच्या शेतीमुळे, त्यात त्यांनी मिळविलेल्या यशामुळे तालुक्‍यासह जिल्ह्यातील हे पीक घेणारे त्यांना ‘कोथिंबीर किंग’ म्हणून ओळखू लागले आहेत.

सतत दुष्काळ, तीव्र पाणीटंचाईपुढे शेतकऱ्यांची हतबलता पाहून रमेश बिराजदार यांना शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची सवयच लागली. आहे त्या पाण्यावर त्यांनी पारंपरिक पिकांऐवजी कमी कालावधीत चांगले उत्पादन, उत्पन्न देणाऱ्या कोथिंबीर पिकाचा अभ्यास केला. त्यासाठी कास्ती (ता. लोहारा) भागातील काही शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या भागातच गावरान कोथिंबिरीचे बियाणे मिळते. ते आणून त्यांनी प्रथम काही एकरवर लावगवड केली. योग्य नियोजन, उत्तम निगा राखल्याने त्यांना या थोड्या क्षेत्रातच चांगली कमाई झाली आणि मग त्यांनी शेतीची पटरीच बदलली. 

गावरान कोथिंबिरीचे बियाणे दोनशे रुपये किलोच्या पुढे आहे. बियाण्यावर जास्त खर्त होत असल्याने बिराजदार यांनी शेतात दर्जेदार बियाणे तयार केले. स्वनिर्मित बियाण्यापासून गेल्या चार वर्षांपासून ते कोथिंबिरीची शेती करीत आहेत. चार ते पाच एकरांचे टप्पे पाडून त्यांनी वीस ते पस्तीस एकरांवर या पिकाचे उत्पादन घेतले आहे. त्यांना फक्त खर्च येतो तो खुरपणी, खते, दोन ते तीन फवारण्यांचा. बिराजदार यांच्या कोथिंबिरीला एकरी वीस हजार ते सव्वालाखापर्यंत दर मिळाला आहे. जागेवरच व्यापारी येत असल्याने मजूर, वाहतूक, दलाली, हमाली आदी खर्च वाचतोय. यंदाही त्यांनी बारा एकरांवर कोथिंबिरीची लागवड केली आहे. सध्या दर घसरले असले, तरी उच्च दर्जाच्या कोथिंबिरीमुळे पावणेतीन लाखाला सौदा झाल्याचे त्यांनी सांगितले. पिकाचे टप्पे पाडल्याने एका टप्प्यात दर कमी मिळाला तरी तो दुसऱ्या टप्प्यात भरून निघतो, चांगला नफा होतो असे त्यांचे म्हणणे आहे. दर खूपच पडतात तेव्हा ते पीक बियाण्यासाठी ठेवतात. बियाण्यालाही अनेक ठिकाणांहून मागणी होते. त्यातूनही उत्पन्न मिळते. 

पारंपरिक शेतीऐवजी योग्य नियोजन, मार्गदर्शन घेत कमी कालावधीतील पिके घेतली तर नक्कीच पदरात चार पैसे पडतात. अनेकजण फक्त नशीब, निसर्गाला दोष देण्यातच धन्यता मानतात. ‘तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या वृत्तीने शेती केली तर ती कधीच तोट्यात जात नाही.
- रमेश बिराजदार, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer ramesh birajdar success