जिद्दीमुळे शेतकऱ्याचा झाला चित्रकार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

जिद्द असली की, मनुष्य कठीण वाटणारे ध्येयही साध्य करू शकतो. त्याचीच प्रचीती शेतकरी कुटुंबातील मारुती कांबळे यांनी नांगराऐवजी कुंचला हाती घेऊन चित्रकलेतील प्रगतीतून दिली आहे. कलाशिक्षक म्हणून काम करणाऱ्या कांबळे यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन नुकतेच फोर्ट परिसरातील आर्ट प्लाझा गॅलरीत भरवण्यात आले होते.  

मालाड - जिद्द असली की, मनुष्य कठीण वाटणारे ध्येयही साध्य करू शकतो. त्याचीच प्रचीती शेतकरी कुटुंबातील मारुती कांबळे यांनी नांगराऐवजी कुंचला हाती घेऊन चित्रकलेतील प्रगतीतून दिली आहे. कलाशिक्षक म्हणून काम करणाऱ्या कांबळे यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन नुकतेच फोर्ट परिसरातील आर्ट प्लाझा गॅलरीत भरवण्यात आले होते.  प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्ररसिकांनीही त्यांचे आवर्जून कौतुक केले.  

शेतकरी कुटुंबातील मारुती कांबळे यांना घराण्यातून चित्रकलेचा कोणताही वारसा मिळालेला नाही. परंतु, आवड, चिकाटी व जिद्द यांच्या जोरावर त्यांनी नांगर सोडून कधी कुंचला हाती घेतला ते त्यांनाही कळलेच नाही. स्वप्नवत वाटणारी बाब चित्रकार कांबळे यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. 

मारुती कांबळे यांचे वडील व्यवसायाने शेतकरी. त्यांची शेतीही बेताची. घरची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने एका खेड्यातून कलेचे स्वप्न उराशी घेऊन त्यांनी मुंबईची वाट धरली; पण त्याअगोदर त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने त्यामध्ये वास्तवातील रस ओतण्याचे काम केले ते त्यांचे गुरू कलाश्री वसंत शिंदे यांनी. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या कलाजीवनाला खरी दिशा मिळाली.   

कांबळे यांना कला क्षेत्रातील बरेच पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय, त्यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारही मिळाला आहे. कांबळे एक उत्तम कवी असून त्यांनी अनेक कविसंमेलनांत प्रबोधनात्मक कविताही सादर केल्या आहेत. त्यांच्या कलेचे कौतुक  होत आहे.

कुटुंबाचा पाठिंबा
मारुती कांबळे यांचा निसर्गचित्र आवडता विषय. निसर्गाची विविध रूपे जलरंगांतून साकारणे त्यांचा मुख्य छंद आहे. त्यांच्या छंदाला चालना देण्याचे काम आई-वडिलांनी केले. गावी शेतात राबणारे कांबळे यांचे हात आज कुंचला घेऊन मुंबईसारख्या शहरात स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहत आहेत. त्यासाठी त्यांच्या पत्नी रेखाही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer was a artist