'त्या'च्यासाठी तो झाला ‘बाबा’!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जून 2016

आदित्य म्हणजे बिन्नीला दत्तक घेऊन त्याचं आयुष्य फुलवणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर. सिंगल पॅरेंट असलेल्या आदित्यने अवनीश म्हणजे बिन्नीला हक्काच घर आणि ‘बाबा’ मिळवून दिले.

आदित्य म्हणजे बिन्नीला दत्तक घेऊन त्याचं आयुष्य फुलवणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर. सिंगल पॅरेंट असलेल्या आदित्यने अवनीश म्हणजे बिन्नीला हक्काच घर आणि ‘बाबा’ मिळवून दिले.

दोन वर्षांच्या अवीच्या सकाळी उठण्याबरोबर आदित्यच्या दिवसाची सुरवात होते. अवीचं खाणं- पिणं, अंघोळ, थोडा वेळ त्याच्याशी खेळणं आणि घड्याळाच्या काट्याकडे बघत स्वतःची ऑफिसची तयारी करणं. ऑफिसला जाताना अवीची जबाबदारी आई- वडिलांकडे सोपवून त्यांना लवकर येण्याचं आश्‍वासन देणं, ऑफिसमधून सुटल्यावरही पुन्हा अवीसाठी घरी येण्याची घाई, घरी आल्यावर पुन्हा अवी आणि तो! लहान मुलं असलेल्या घरातील हे सर्वसाधारण चित्र असलं, तरी अवी आणि आदित्यची ही गोष्ट खूप वेगळी आहे. हे दोघं खऱ्या आयुष्यातील ‘हिरो’ आहेत. अवनीश म्हणजे पूर्वीचा बिन्नी, जो चांगल्या घरी जन्माला येऊनही केवळ डाऊन सिन्ड्रोम असल्यामुळे तिसऱ्या महिन्यातच अनाथाश्रमात आलेला. आदित्य म्हणजे या बिन्नीला दत्तक घेऊन त्याचं आयुष्य फुलवणारा २९ वर्षांचा पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला ‘सिंगल पॅरेंट’! कायदेशीर बाबींची पूर्तता करताना जवळपास दीड वर्ष संघर्ष करून आदित्यने ‘अवनीश’ला हक्‍काचं घर आणि ‘बाबा’ मिळवून दिले!  

आदित्य मूळचा इंदूरचा. मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबात वाढलेला. लहानपणापासूनच आदित्यने त्याचे आई- वडील गरजूंना मदत करण्यासाठी प्रसंगी आपल्या गरजा बाजूला ठेवत असल्याचं पाहिलं होतं. त्यांच्या या स्वभावातूनच आदित्यला पुढे स्थिरस्थावर झाल्यावर एखादं मूल दत्तक घेण्याची इच्छा निर्माण झाली होती. १३ सप्टेंबर २०१४  हा दिवस त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. वडिलांच्या वाढदिवसादिवशी एका अनाथालयात मुलांना भेट देण्यासाठी गेल्यावर त्याची सहा महिन्यांच्या गोंडस बिन्नीशी भेट झाली. एखाद्या अनाथालयाला भेट देण्याची त्याची ही पहिलीच वेळ. सर्व मुलांमध्ये त्याची नजर बिन्नीवर खिळली. त्याचवेळी बिन्नीला दत्तक घेण्याचा त्याचा निर्णय झाला होता. मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया बरीच किचकट असते, त्यातही ‘विशेष मूल’ असेल तर या समस्यांमध्ये आणखीच भर पडते. घरातून पाठिंबा मिळाला तरी सरकारी अधिकाऱ्यांची, अनाथालयाची उदासीनता, कायद्यातील काही अटींमुळे त्याला बराच संघर्ष करावा लागला. सुरवातीला तो अविवाहित आहे, तीस वर्षांपेक्षा कमी वय, अशा त्रुटी काढत आदित्यला बिन्नीला दत्तक घेण्यास नकार मिळाला. अटींची पूर्तता होईपर्यंत त्याचा वैद्यकीय खर्च करण्याची परवानगी त्याने मिळवली. आता आठ- पंधरा दिवसांनी पुण्याहून इंदूरला येण्यासाठी बिन्नी एक निमित्त बनला होता. पण, पुढच्या काही दिवसांत त्याला अनेक बिकट प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. शेवटी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी स्वतः यात लक्ष घालून त्याला मदत केली. दरम्यानच्या काळात, ऑगस्ट २०१५ मध्ये कायद्यात बदल होऊन वयाची अट शिथिल झाल्याने आदित्य लगेचच बिन्नीला दत्तक घेऊ शकणार होता. पुढच्या पंधरा दिवसांत आदित्यने कायदेशीर बाबींची पूर्तता केली. पुन्हा काही अडचणींनी डोकं वर काढलंच. पण, त्यावर मात करून तो आता कायद्याने ‘अवनीश’चा बाबा झाला आहे. देशातील सर्वांत तरुण ‘सिंगल पॅरेंट’ होण्याचा मानही त्याला मिळाला आहे!

यावर्षीच्या सुरवातीला बिन्नीला तो त्याच्या घरी घेऊन आला. याबद्दल बोलताना आदित्य म्हणतो, ‘‘मागील एक- दीड वर्षापासून मी बिन्नीला घरी आणण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होतो. त्याच्यासाठी खेळणी, कपडे अशी सगळी जय्यत तयारी झालीच होती. माझ्यासाठी तर हे न्यू ईयरचं स्पेशल गिफ्टच होतं.’’ आदित्यच्या घरी आल्यावर ‘बिन्नी’ आता ‘अवनीश’ झाला आहे. अवनीश हे गणपतीचं एक नाव. घरी सगळे त्याला ‘अवी’ म्हणूनच ओळखतात. अवी घरी आल्यापासून आदित्यच्या जबाबदाऱ्या अधिक वाढल्या आहेत. आदित्यचा सुटीचा दिवसही अवीला आवडतं ते बनवण्यात, त्याच्यासाठी खरेदी करण्यात, त्याला फिरवण्यात जातो. डाऊन सिन्ड्रोम असल्यामुळे अवीसाठी लाइट आणि म्युझिकवरील खास खेळणी आदित्यने परदेशातून मागवून घेतली आहेत. या खेळण्यांमध्ये तो छान रमतो. अवीच्या हृदयाला छिद्र होतं; पण मागील काही दिवसांत त्याची योग्य ती काळजी घेतल्याने आता इतर सामान्य मुलांसारखी त्याची वाढ चांगली होत आहे आणि त्याच्यावर सर्जरी करण्याची आवश्‍यकता नसल्याचं चेन्नईच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांनी मागील आठवड्यातच सांगितलं आहे. अवीसाठी आदित्य दोन महिन्यांपासून ‘ॲडॉप्शन लीव्ह’वर आहे. सध्या पूर्णवेळ तो अवीसोबत घालवतो. याबद्दल बोलताना आदित्य सांगतो, ‘‘आमच्या दोघांमध्ये घट्ट नातं तयार झालं आहे. त्याला काही हवं- नको ते मला आता बरोबर समजतं. त्याला खाण्यासाठी जे काही आवडतं, ते मी स्वतःच बनवतो. त्याला गाणी आणि त्यावर नाचायलाही खूप आवडतं. मागील काही दिवसांत आम्ही दोघं दिल्ली, हैदराबाद, इंदूर, पुणे, मुंबई, चेन्नई अशी खूप ठिकाणं फिरलो.’’ ‘तुम्ही दोघंच?’ या कुतुहलात्मक प्रश्‍नावर मात्र, ‘‘मी एकटा त्याची काळजी घेऊ शकत नाही का?’’ असा प्रतिप्रश्‍न करून आदित्य आपल्यालाच निरुत्तर करतो. 

‘सिंगल पॅरेंट’ म्हणून आदित्यचा विशेष मूल दत्तक घेण्याचा निर्णय, त्यासाठीचा संघर्ष आपल्या मनात त्याच्याबद्दल कुतूहल, कौतुक निर्माण करतो; पण त्याच्या या उत्तराने पालकत्व निभावण्याचं त्याचं भान दिसून येतं आणि त्याच्याबद्दलचा आदर आपोआपच वाढतो.

Web Title: father's day