'आदर्श गाव'द्वारे आर्थिक सक्षमीकरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी
नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा ब्रॅंड निर्माण करून गावातील कुटुंबांच्या आर्थिक सक्षमीकरणात यशस्वी झालीत. "आदर्श गाव' हाच ब्रॅंड त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देतोय. या योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीचा वापर योग्य पद्धतीने करून गावाची आर्थिक घडी बसवण्यात बाजी मारली आहे.

पोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी
नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा ब्रॅंड निर्माण करून गावातील कुटुंबांच्या आर्थिक सक्षमीकरणात यशस्वी झालीत. "आदर्श गाव' हाच ब्रॅंड त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देतोय. या योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीचा वापर योग्य पद्धतीने करून गावाची आर्थिक घडी बसवण्यात बाजी मारली आहे.

आपण एखाद्या गावातील कुटुंबाला आदर्श म्हणतो, तेव्हा त्याने स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला असतो. आदर्श गाव योजनेतूनही अशीच शिकवण समाजात रुजू होते. या योजनेतील अनेक अटींमुळे गाव आपोआप चांगल्या वाटेने जाते. श्रमदानामुळे एकोपा वाढतो, समन्वय वाढतो. पारदर्शकतेमुळे तंटे संपतात. योजनेच्या प्रभावी कार्यवाहीने कुटुंबासह संपूर्ण गावाला आर्थिक फायदा आपोआप मिळतो.

हिवरेबाजारने (जि. नगर) अशा प्रकारे गावाचा विकास साधलाय. आदर्श गाव झाल्यानंतर स्वतःचा ब्रॅंड कसा तयार होतो, हे हिवरे बाजारने दाखवून दिलेय.

देशपातळीवर आदर्शवत काम
महाराष्ट्रातील हिवरे बाजार व राळेगणसिद्धी (जि. नगर), राजगड (जि. चंद्रपूर), भागडी (जि. पुणे), दवणगाव (जि. लातूर) यांची नावे देशपातळीवर आदर्श गाव म्हणून घेतली जातात. त्यांनी विविध योजना राबवताना कुटुंबाच्या उन्नतीला प्राधान्य दिले. विशेषतः शेतीला जोडव्यवसाय म्हणून दूध उत्पादन, महिला बचत गटांद्वारे वस्तूंचे उत्पादन यांद्वारे कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवल्या. उपजीविका घटकांमधून बचत गटांना फिरता निधी दिला. उद्यमशील व्यक्तींना गट किंवा संघाच्या उपक्रमांसाठी अनुदान दिले. ग्रामीण उद्योगांना चालना मिळाली. आदर्श गावांनी हीच नस पकडून कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम केले.

गुणवत्ता, जलसंधारणातून आर्थिक विकास
आदर्श गाव योजनेअंतर्गत गुणवत्तापूर्ण जलसंधारण कसे होते, हे हिवरे बाजारने (जि. नगर) दाखवून दिले. त्याचाच कित्ता गिरवत अनेक गावे स्वयंपूर्ण झाली. साखराने (जि. वाशीम) जलसंधारणातून साधलेली प्रगती बोलकी आहे. गावात 12 हेक्‍टर जमिनीवर खोल समपातळी चर खणले. 421 हेक्‍टरवरील बांधबंदिस्तीमुळे गावातील 65 विहिरी तुडुंब भरल्या. पिकाखालील क्षेत्र शंभरवरून 400 हेक्‍टरवर पोचले. गावचे शेती उत्पन्न 15 कोटींवर पोचले. जमिनीचा भावही लाखावरून तब्बल 15 लाख एकरी पोचला. हिवरे बाजारप्रमाणेच हे गावही गावाबाहेरच्यांना जमिनी विकत नाही. गावातच मजुरी मिळाल्यामुळे स्थलांतर थांबले.

माळकिन्हीचा भाजीपाला दिल्लीत
महागाव (जि. यवतमाळ) - माळकिन्ही (जि. यवतमाळ) गावाने भाजीपाला लागवडीतून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. येथील शेतकरी गजानन खंदारे यांचा भाजीपाला राज्याच्या उपराजधानीसह देशाच्या राजधानीत पोचलाय. माळकिन्हीची लोकसंख्या दोन हजार. गावात सामाजिक सलोखा नांदतोय. बहुतांश शेतकरी शेतातच राहतात, राबराब राबतात. प्रामुख्याने टोमॅटो, कोबी, दोडकी, काकडी, कोथिंबीर, कारले, कांदा इत्यादींचे उत्पादन घेतात. केळीसाठी गावाची विशेष ओळख आहे. येथील भाजीपाला नागपूर, वर्धा, अमरावतीसह आंध्र प्रदेशातही जातो. आदर्श गावासाठीचे सर्व निकष गाव पूर्ण करत आहे.

पोखरी बनले स्मार्ट व्हिलेज
औरंगाबाद - योग्य नियोजन, जिद्द, मेहनत, मोठ्या प्रमाणातील लोकसहभागाने गावातील कारभाऱ्यांनी पुढाकार घेतल्यास त्याचा कायापालट होतो. इतकेच नव्हे, तर ग्रामविकासातून आर्थिक सक्षमीकरणसुद्धा साधते, अशी किमया पोखरीने (ता. औरंगाबाद) साधली आहे. येथील शेतकऱ्यांनी भाजीपाला, फुलशेती करून आर्थिक उन्नती साधली. सरपंच अमोल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास सुरू आहे.

पोखरीतील रस्ते, पाणी, शाळा, अंगणवाड्या, व्यायामशाळा, पाळणाघर, मिनरल वॉटर प्लांट, वृक्षारोपण, पथदीप शहराला लाजवतील असे आहेत. गावात सीसीटीव्ही कॅमेरे असून, ग्रामपंचायतीला कॉर्पोरेट लूक दिला आहे. गावात पुरुषांचे चार, तर महिलांचे आठ बचत गट आहेत.

2006-07 मध्ये तत्कालीन सरपंच भाऊसाहेब मगरे यांनी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार स्वीकारला होता. पोखरीतील दोन्ही अंगवाड्या, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत यांना आयएसओ प्रमाणपत्र आहे. 12 एकर गायरान जागेत ग्रामपंचायतीने दहा हजार वृक्षारोपण केले आहे. गावात जी व्यक्ती कर भरते त्यासाठी मोफत पिठाच्या गिरणीची व्यवस्था केली आहे.

आदर्श गावची मूळ संकल्पना लोकसहभाग, हागणदारीमुक्ती, गाव आणि संस्कृती, ग्रामसभा ही आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे शेतीचे उत्पादन वाढते. साहजिकच कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. दूध, भाजीपाला आणि शेतीपूरक उत्पादनांमुळे कुटुंबाची आर्थिक उन्नती होते. आदर्श गाव योजनेची पाहणी करण्यासाठी सहभाग घेतलेल्या गावात प्रत्येक महिन्यास योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांचे तांत्रिक पथक जाते. झालेल्या खर्चातून बदल काय झाले, हेच ते प्राधान्याने तपासतात. त्यामुळे गावचा चेहरा बदलण्यास वेळ लागत नाही.
- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती, महाराष्ट्र

Web Title: Financial empowerment through Adarsh village