एक एकरवर फुलवला भाजीचा मळा

सिद्धेश परशेट्ये
बुधवार, 1 मार्च 2017

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. शेतकरी आपल्या जमिनीकडे दुर्लक्ष करून त्यांना मुंबई, पुण्याला शहरांमध्ये नोकरीच्या निमित्ताने पाठवितात. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होते; मात्र शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत. विविध प्रकारची शेती करून आपला उदरनिर्वाह करता येतो. त्यासाठी मेहनत घेतल्यास आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल.’’
- गंगाराम कंचावडे

खेड - तालुक्‍यातील सुसेरी येथील गंगाराम नारायण कंचावडे यांनी एक एकर क्षेत्रात विविध फळभाज्यांची लागवड केली आहे. मका, भेंडी, पावटा यांसह विविध आंतरपिकांची लागवड करून सहा महिन्यांत सुमारे दोन लाखांचे उत्पन्न घेतले आहे. 

गंगाराम कंचावडे यांचे शिक्षण कमी असले तरी मुळातच शेतीची आवड मेहनत व जिद्दीच्या जोरावर त्यांनी सुसेरी येथील जमिनीत शेती करण्याचे ठरवले. यासाठी पत्नी मनीषा यांनीही मदत केली. सुसेरी नारंगी नदीच्या किनारी असल्याने दरवर्षी नारंगी नदीला पूर येतो. त्यामुळे कंचावडे यांच्या शेतात नेहमीच पुराचे पाणी घुसते. त्यामुळे शेतीचे नुकसान होते. परंतु त्यामुळे खचून न जाता कंचावडे गेली १५ वर्षे उन्हाळी शेतीतूनच चांगले उत्पन्न घेतले. एक एकर जमिनीमध्ये मिरची, पावटा, काकडी, मका, चवळी, झेंडू, पडवळ, वांगी, भोपळा, भेंडी व तूर यांसह माठ, लाल माठ, पालक, मुळा या पालेभाज्याची लागवड केली आहे. ही भाजी रोज सकाळी खेड बाजारपेठेत विक्रीसाठी नेली जाते. तेथील स्थानिक महिला खेड बाजारपेठ, भरणे व शिवतर पंचक्रोशीत विकून येतात. येथील भाजीला थेट बाजारपेठ मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याची माहिती सौ. मनीषा कंचावडे यांनी दिली.

शेतकऱ्यांनी घेतला आदर्श
कंचावडे यांनी केलेल्या प्रयोगाचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यांनीही आपल्या शेतात भाजीपाल्याची लागवड करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सुसेरी गावातील हा परिसर भाजीपाल्याचे उत्पादन घेणारा भाग म्हणून प्रसिद्ध झाला आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. शेतकरी आपल्या जमिनीकडे दुर्लक्ष करून त्यांना मुंबई, पुण्याला शहरांमध्ये नोकरीच्या निमित्ताने पाठवितात. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होते; मात्र शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत. विविध प्रकारची शेती करून आपला उदरनिर्वाह करता येतो. त्यासाठी मेहनत घेतल्यास आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल.’’
- गंगाराम कंचावडे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gangaram kanchwade story