"दीदीच्या' शाळेत चिमुकल्यांची प्रगती

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

वस्तीतील मुलांना शिकवताना त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज जाणवते. त्यांना शिकायला आवडते, फक्त त्यांना संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे लहानपणीच या मुलांचा अभ्यासाचा पाया पक्का करण्याचे माझे उद्दिष्ट आहे. 
- गौरी सोनवणे 

पुणे- त्यांचे आई-वडील मोलमजुरी करतात. त्यामुळे घरी शिक्षणास पोषक वातावरण नाही आणि योग्य संस्कार तर लांबच. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोथरूडमधील केळेवाडी वस्तीतील मुला-मुलींना मिळाली "दीदीची शाळा‘. या शाळेमुळे मुलांच्या अभ्यासात सुधारणा होत असून, पालकही आनंदी झाले आहेत. स्वयंस्फूर्तीने वस्तीमध्ये विनाशुल्क शाळा घेणारी ही दीदी म्हणजे गौरी सोनवणे. 

गौरीने (वय 32, रा. कोथरूड) समाजशास्त्राची आणि सामाजिक कार्याची पदवी घेतली आहे. शिक्षणानंतर त्यांनी काही वर्षे स्वयंसेवी संस्थांमध्ये काम केले. वस्त्यांमधील रहिवाशांसाठी काम करण्यासाठी त्यांनी स्वतःची संस्था सुरू केली. कोथरूड परिसरात सर्वेक्षण करून कोणत्या मुलांना मार्गदर्शनाची गरज आहे, याचा शोध घेतला. केळेवाडी वस्तीतील विनाशुल्क शाळेची कल्पना तेथील पालकांनाही पटल्याने त्यांनी लगेचच संमती दिली. शाळेसाठी वस्तीतील एकाची पत्र्याची खोली भाडेतत्त्वावर मिळाली आणि सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली गौरीदीदीची शाळा. 

दररोज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत शाळा भरते. शाळेत पहिली ते आठवीपर्यंतची 25-30 मुले येतात. गौरी वर्गात सुरवातीला मुलांकडून प्रार्थना म्हणून घेते, छोटे व्यायाम करून घेते. त्यानंतर झालेल्या अभ्यासाची उजळणी होऊन नवीन अभ्यासास सुरवात होते. मराठी-इंग्रजी अक्षर ओळख, छोटे इंग्रजी शब्द, 1 ते 100 अंक, पाढे, गाणी-प्रार्थना ती मुलांना शिकवते. छोटी गणिते सोडवायला देते, गोष्टी सांगते, गोष्ट लिहून देते. त्यासाठी तिने ठळक-मोठ्या अक्षरात शब्दांची कार्डस बनवली आहेत. अध्ययन अजमावण्यासाठी गौरी मुलांची लेखी परीक्षाही घेते. कधी वर्गात अभ्यासास पूरक खेळ खेळले जातात, तर कधी सणही साजरे होतात. दर महिन्याला पालकांची बैठक घेऊन मुलांची प्रगती किंवा कमतरता पालकांना सांगितली जाते. 

मुले म्हणतात ....
विनायक कांबळे - दीदी इंग्रजी-गणित शिकवत्यात, कहानी सांगत्यात, इथं आल्यावर मला वाचायला यायला लागलं. 

साक्षी साळवे - इथं यायला उशीर झाला, तरी दीदी वर्गात घेतात. त्यांनी आम्हाला इंग्रजी-मराठी वाचायला शिकवले. गोष्ट लिहायला दिली होती आणि पिच्चर दाखवला होता. 

 

Web Title: gauri sonawane's school