लासुरा गावात घरांवर मुलींच्या नावाच्या 'नेमप्लेट'

श्रीधर ढगे
रविवार, 8 एप्रिल 2018

शेगाव तालुक्यातील लासुऱ्यात घरांची, माणसांची ओळख हीच मुलीच्या नावाने असलेल्या घरांवरील पाटीवरून होतेय. या गावाने नवा आदर्श मांडला आहे.

खामगाव : आमची मुलगी, आमचा सन्मान या वाक्याचा खरोखर प्रत्यय शेगाव तालुक्यातील लासुरा खुर्द व बुद्रुक गावाला भेट दिल्यानंतर येतो. या गावातील घरांवर मुलींच्या नावाने नेमप्लेट लावण्यात आल्या असून स्त्री जन्माचे घरोघरी स्वागत केले जाते.

आज महिलांना 50 टक्के आरक्षण असले तरी आपल्या समाजाने पुरुषप्रधान संस्कृती स्वीकारली आहे. मुलगी आजही नकोशी आहे. स्त्री पुरुष भेदातूनच गर्भ लिंग निदानासारख्या वैज्ञानिक सुविधांचा दुरूपयोग साधून गर्भातच मुलींना मारण्याचे दुर्दैवी वास्तव देशभर समोर आले आहे. स्त्री शक्तीची उपासना करणाऱ्या आपल्या समाजात स्त्री म्हणून तीच जगणं नाकारणारे लाखो आहेत. मात्र आता शासन व सामाजिक संघटनांच्या जनजागृतीला कायद्याचा आधार लाभल्याने समाजमनात आता बदल होतोय. असेच एक उदाहरण लासुरा गावाचे आहे. शेगाव तालुक्यातील लासुऱ्यात घरांची, माणसांची ओळख हीच मुलीच्या नावाने असलेल्या घरांवरील पाटीवरून होतेय. या गावाने नवा आदर्श मांडला आहे.
NamePlate

छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांच्या जन्मस्थळाने पुनीत मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील लासुरा या गावाची ही धडपड मुलीला पित्याच्या मालमत्तेत अर्धा हिस्सा देणाऱ्या कायद्याच्या पुढे जात मुलापेक्षा मुलगी श्रेष्ठ मानणाऱ्या समाज जडघडणीला पूरक वाट दाखवणारी आहे. हा उपक्रम काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आला. शेतकरी संघटनेत काम करणाऱ्या ज्योती गजानन पटोकार या तरूणीने ही कल्पना मांडली. त्याला गावकरी व प्रशासकीय साथ लाभली आणि घरांवर मुलींच्या नावाने पाट्या लागल्या. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी या कल्पनेला मूर्तरूप दिले. लासुरा खुर्द व बुद्रुक या गावाची लोकसंख्या जवळपास 2500 आहे. खेडेवजा हे गाव इतर गावा ₹सारखंच आहे. मात्र कन्या माझी भाग्याची हा जागर करत या गावाने आपली वेगळी ओळख जपली आहे.

NamePlate2

ज्योतीने लावली ज्योत -
लासुरा गावातील घरांवर मुलीच्या नावाने पाट्या  असाव्यात ,मुलगी हीच घराची खरी ओळख असावी ही कल्पना ज्योती गजानन पटोकार यांनी मांडली आणि प्रत्यक्ष कृतीतून ही संकल्पना साकार केली. ज्योतीने लावलेली ही ज्योत गावकरी तेवत ठेवत आहेत.

अशी आहे पाटी -
गावात गेल्यावर मुलींच्या नावाने घरांवर नेमप्लेट लागलेल्या दिसतात. त्यावर आधी मुलीचे नाव नंतर आई व वडील यांच्या नावाचे पहिलं अक्षर आहे. राज्यात बेटी बचाव, बेटी पढाव हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने त्यात वेगळा सहभाग म्हणून गावातील 210 घरांवर आम्ही मुलींच्या नावाने पाटी लावण्यासाठी पुढाकार घेतला. हा उपक्रम राज्यात पहिल्यांदा आम्ही राबविला असे ज्योती पटोकार यांनी सांगितले.

लेकींचा सन्मान जपणारं गाव! -
जन्माला आलेली मुलगी म्हणजे साक्षात लक्ष्मी, असे मानणारी आपली संस्कृती आहे. मुलगी सासर, माहेर अशा दोन्ही घरांचा सांभाळ करणारी आणि प्रगतीकडे नेणारी. मात्र वंशवेल वाढावी म्हणून वंशाच्या दिव्यासाठी गर्भातच मुलीचा गळा घोटणारी जमात या समाजात पैदा झाली आहे. अशा कुप्रवृत्तीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून मुलींचा सन्मान कसा करावा हे लासुरा ग्रामस्थांनी समाजाला शिकवले आहे. या गावात प्रत्येक घरांवर आई वडिलांच्या नावासह मुलींच्याच नावाच्या पाट्या लावल्या आहेत.
मुलींना कुटुंबप्रमुखाचा मान देऊन त्यांचा खऱ्या अर्थाने गौरव करण्यात आला आहे. गावाला नवी ओळख देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या संदेशापासून इतर ग्रामस्थानी निश्चितच बोध घ्यायला हवा.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girls Nameplate in Lasura Village in Every Homes Door