'दीपस्तंभ'ने उंचावले दिव्यांगांचे "मनोबल'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

दोन संस्थांच्या मदतीमुळे सांगली व नगर जिल्ह्यांतील प्रज्ञाचक्षूंची बॅंकअधिकारीपदी निवड

दोन संस्थांच्या मदतीमुळे सांगली व नगर जिल्ह्यांतील प्रज्ञाचक्षूंची बॅंकअधिकारीपदी निवड
नाशिक - असे म्हणतात, की निसर्ग कुणावरही अन्याय करीत नाही. एखाद्यामध्ये न्यूनता असल्यास नियती त्यावर मात करण्याची जिद्द त्या सजीवाला बहाल करते. अशीच संधी मिळाली ती सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्‍यातील कवठे एकंद गावातील महादेव रामचंद्र पाटील या तरुणाला आणि नगर जिल्ह्यातील राहता तालुक्‍यातील आडगाव गावाच्या नंदा रामदास शेळके या युवतीला.
महादेव आणि नंदा हे दोघे शंभर टक्के अंध असूनही आज त्यांची निवड आयबीपीएस परीक्षेद्वारे बॅंकेत अधिकारी पदावर झाली आहे. या दृष्टीहीन तरुणांच्या या यशाचे कारण ठरले ते म्हणजे जळगावचे दीपस्तंभ मनोबल केंद्र.

महादेव पाटील याचे बालपण गावातच गेले. छाया पाटील आणि रामचंद्र पाटील यांचा महादेव एकुलता मुलगा. बालपणी त्याची दृष्टी सक्षम होती. माध्यमिक शिक्षण घेत असताना महादेववर एकामागे एक अशी संकटे आली. यात त्याची दृष्टी गेली. तरीही महादेव डगमगला नाही. ब्रेल लिपीत शिक्षण घेत तो आईला शेतीकामात मदत करीत असे. बदलापूर येथे दहावीचे शिक्षण घेऊन रुईया महाविद्यालय (मुंबई) येथे मराठी साहित्यात महादेवने पदवी मिळविली. पुढे काय करावे, असा प्रश्‍न मनात घोंगळत असताना त्याने आळंदीत "दीपस्तंभ'चे जयदीप पाटील यांचे व्याख्यान ऐकले. त्यातून स्पर्धा परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली. दीपस्तंभ मनोबल केंद्रात वर्षभर स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण मिळाले. या सर्व संघर्षातून महादेवने यशाला गवसणी घातली.

खडतर प्रवास
नंदाचा प्रवासही असाच काहीसा खडतर. शिर्डीपासून 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आडगाव गावातील नंदाचा जीवनप्रवास जळगाव जिल्ह्यात सुरू झाला. कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना येथे नंदाचे वडील रामदास शेळके बॉयलर ऑपरेटर होते. नंदा सातवीत असताना डॉक्‍टरांच्या हलगर्जीमुळे आजारपणात तिची दृष्टी गेली. धुळे येथे अंध शाळेत दहावी पूर्ण केली. कारखाना बंद पडल्यामुळे आई-वडील शेतीसाठी आडगाव येथे परत गेले. तेव्हा नगर येथे तिने इतिहास विषयात पदवी पहिल्या श्रेणीत पूर्ण केली. महाविद्यालयात असताना यजुर्वेंद्र महाजन यांची भेट झाली. त्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने नंदाने "दीपस्तंभ'च्या स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश घेतला. दीड वर्ष प्रशिक्षण घेतलेल्या नंदाची निवड युनियन बॅंक ऑफ इंडियामध्ये झाली आहे.

दीपस्तंभ मनोबल प्रकल्पामुळे महादेव, नंदा यांच्यासारख्या 18 प्रज्ञाचक्षू तरुणांनी यशाने गवसणी घातली आहे. समाजाने पाठिंबा देऊन या प्रकल्पाला उभारायला मदत केल्यामुळे हे कार्य उभे राहात आहे.
- यजुर्वेंद्र महाजन, संस्थापक, मनोबल, जळगाव

Web Title: handicaped moral tall by deepstambh