जिवंतपणी दिली अत्यंविधीसाठी मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

कोल्हापूर - महापालिकेच्या मोफत अंत्यविधी योजनेचा लाभ घेण्यात शहरातील गोरगरिबांसोबत अनेक चांगली अर्थिक स्थिती असणारे लोकही आहेत, पण महापालिकेच्या तिजोरीवरचा अार्थिक भार कमी करण्याचे फारसे कोणाच्या ध्यानात येत नाही. सानेगुरुजी वसाहत येथील बापू सदाशिव पाटील यांनी मात्र स्वत:च्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या खर्चाचे पाच हजार रुपये महापालिकेच्या दानपेटीत टाकले असून सोबत आयुक्तांना एक पत्रही दिले आहे.

माझ्याकडून फूल ना फुलाची पाकळी असे म्हणत कागदात गुंडाळून त्यांनी ही रक्कम महापालिकेच्या स्मशानभूमीतील दानपेटीत टाकली. दानपेटी उघडताच हे पत्र व त्यासोबत पाच हजार रुपये मिळाले, पत्र आणि पैसे पाहून अधिकारीही अचंबित झाले. 

महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीत मोफत अंत्यविधी केले जातात. अशाप्रकारची सुविधा देणारी कोल्हापूर महापालिका ही पहिलीच महापालिका आहे. एका मृतदेहाच्या दहनासाठी  महापालिकेला सुमारे दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो. वर्षभरात सुमारे साडेचार हजार मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. गरिबांबरोबरच ज्यांची चांगली परिस्थिती आहे, तेदेखील तसेच निघून जातात. सेवा मोफत आहे, पण स्वेच्छेने दानपेटीत रक्कम टाकावी, अशी अपेक्षा असते. जवळचे नातेवाईक दुःखात असतात, पण इतरांनी ही बाब लक्षात आणून देणे अपेक्षित असते. परिणामी दानपेटीकडे दुर्लक्षच 
केले जाते.

ही सर्व बाब असताना सानेगुरुजी वसाहत येथील बापू पाटील यांनी महापालिकेचा विचार केला आहे. दीड महिन्यापूर्वी म्हणजेच १४ फेब्रुवारीला त्यांनी आयुक्तांच्या नावे एक पत्र लिहून त्या पत्रामध्ये पाच हजार रुपये ठेवून पत्र गुंडाळून अगदी व्यवस्थितपणे हे पत्र दानपेटीत टाकले आहे. दानपेटीत हे पत्र पाहिल्यानंतर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही भावुक झाले. सामान्य नागरिक किती प्रामाणिक असतात, याचाच एक नमुना आहे.

विचित्र माणसाचेही नमुने
एका बाजूला बापू पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाने दानपेटीत पाच हजार रुपये स्वतःच्या अंत्यविधीसाठी जमा केल्याचे दिसत असतानाच दानपेटीत अज्ञातांनी डिंक ओतूनही महापालिकेची पंचाईत करण्याचा प्रयत्न केला आहे. अज्ञात विकृतांनी हा प्रकार केल्याने काही नोटा या डिंकामुळे एकमेकांना चिकटल्या होत्या. त्यामुळे दोन टोकाच्या घटना आज पंचगंगा स्मशानभूमीवर पाहायला मिळाल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help for the cremation