'हे विश्वची माझे घर' मानून शिक्षिकेचा गोरगरिबांना 'आधार'

प्रशांत गुजर | Wednesday, 21 October 2020

नवरात्रीमध्ये गरजू महिलांना लागेल ती यथाशक्ती मदत करणाऱ्या सातारा येथील सेवानिवृत्त शिक्षिका स्नेहलता शिंदे या खऱ्या अर्थाने आज नवदुर्गा ठरताना दिसत आहेत. मुलांना शिक्षण घेताना परिस्थितीअभावी शिकता येत नाही हे माहीत असल्यामुळे व स्वतः हाडाच्या शिक्षिका असल्याने अशा गरीब कुटुंबातील मुलांनी देखील शिकले पाहिजे, ही भावना मनात ठेऊन या कुटुंबातील मुले व्यवस्थित शिक्षण घेतात, की नाही हे पाहतात.अशा प्रकारे अनेक गरीब कुटुंबांसाठी त्या आधारस्तंभ बनलेल्या आहेत.

सायगाव (जि. सातारा) : अनेक महिला आज समाजासाठी अनेक प्रकारे योगदान देतात; परंतु "हे विश्वची माझे घर' असे मानून नवरात्रीमध्ये गरजू महिलांना लागेल ती यथाशक्ती मदत करणाऱ्या सातारा येथील सेवानिवृत्त शिक्षिका स्नेहलता शिंदे या खऱ्या अर्थाने आज नवदुर्गा ठरताना दिसत आहेत. नवरात्रात आपण करत असलेल्या मदतीमुळे अनेक महिलांच्या चेहरे हरकून जातात याचे खूप समाधान वाटते, असे त्या आवर्जून सांगतात. 

शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यापासून आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने स्नेहलता या गेल्या कित्येक वर्षांपासून आगळ्यावेगळ्या पद्धतीने नवरात्र साजरा करताना समाजातील गरीब, गरजू महिलांचा आधार बनल्या आहेत. दर वर्षी करत असलेल्या या उपक्रमामध्ये अनेक वंचित गरीब कुटुंबाच्या देखील त्या आधार बनल्या आहेत. नवरात्रीमधील नऊ दिवस त्या कपडे, साड्या, कुणाला धान्य अशा प्रकारची जी गरज असेल त्या वस्तूंची मदत करतात. नुसती एवढीच मदत करून न थांबता त्या प्रत्येक कुटुंबाकडे माझी माणसे म्हणून पाहताना त्यांना काय हवे, काय नको यांची विचारपूस करतात.

कार्तिकेय गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा; श्री यमाई देवीची पूजा 

अशा कुटुंबांतील मुलांना शिक्षण घेताना परिस्थितीअभावी शिकता येत नाही हे माहीत असल्यामुळे व स्वतः हाडाच्या शिक्षिका असल्याने अशा गरीब कुटुंबातील मुलांनी देखील शिकले पाहिजे, ही भावना मनात ठेऊन या कुटुंबातील मुले व्यवस्थित शिक्षण घेतात, की नाही हे पाहतात. त्याबरोबर त्याना जे काही लागणारे शालेय साहित्य असते तेदेखील पुरवित असतात. अशा प्रकारे अनेक गरीब कुटुंबांसाठी त्या आधारस्तंभ बनलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला त्यांच्या या उपक्रमामध्ये त्यांची मुलगी श्वेता चव्हाण, तसेच धरती शिंदे, स्वराली शिंदे या दोन्ही सुनादेखील मोठ्या आपुलकीने मदत करतात. आपला वाढदिवसदेखील मोठ्या पद्धतीने साजरा न करता मतिमंद मुलांच्या आश्रमात जाऊन तेथील मुलांना अन्नदान करून साजरा करतात. 

सकारात्मक मन ठेवल्यास कोरोना हरताे : सारिका मिठारे

आजच्या काळात नको तिथे खर्च करून मोठेपणा मिळविण्यापेक्षा स्नेहलता शिंदे यांच्याकडून गरजू महिला व त्यांच्या कुटुंबीयांसाठी होत असलेली ही अनोखी मदत समाजाला दिशादर्शक अशीच आहे. 
-वंदना मांढरे, संस्थापिका, अस्तित्व समाज विकास संस्था, पुणे 

संपादन : बाळकृष्ण मधाळे