उद्योगाच्या परिघावर तिच्या यशाचा झेंडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

नाव सारिका चव्हाण. शिक्षण बीएस्सी, मास कम्युनिकेशन. तंत्रशिक्षणाचा फारसा गंध नाही. तरीही शाळेपासूनच इंजिनिअर होण्याचे स्वप्न. आर्थिक परिस्थितीमुळे विज्ञान शाखेतून पदवी घेतली. मात्र इंजिनिअर होण्याच्या जिद्दीतून पाच वर्षांच्या धडपडीनंतर सर्वसामान्य कामगार ते असिस्टंट जनरल मॅनेजर अशी मारलेली मजल स्तिमित करणारी. 

सारिकाने आठवी-नववीपासून इंजिनिअर होण्याचे मनाशी ठरवले होते. आर्थिक परिस्थितीमुळे दहावी-बारावीनंतर तिला इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता आले नाही; मात्र तिने हार मानली नाही. बीएस्सी पूर्ण केली. त्यानंतर मास कम्युनिकेशनमधून पद्‌व्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यामध्येही ‘पीआर इन कार्पोरेट ऑफिस’ हा विषय निवडला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने माध्यमांशी संलग्न काही काॅर्पोरेट कंपन्यांत काम केले. दीड वर्षांच्या अनुभवानंतर स्वतःच उद्योग क्षेत्रातील काॅर्पोरेट कंपनीत काम करण्याचा निर्णय घेतला. ज्या क्षेत्रात हे काम मुलींचे नाही असे म्हटले जाते, त्याच उद्योग क्षेत्रात तिने नोकरी पत्करली. बॅक ऑफिसची बॅक एम्प्लॉई असे तिचे स्थान होते. तरीही तिने ती नोकरी आनंदाने स्वीकारली. तीन महिन्यांचा हंगामी कालावधी आव्हानात्मक ठरला. इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करायचे होते. तेथे बोलका स्वभाव, इंग्रजीवरील प्रभुत्व, माणसं जोडण्याचं कौशल्य, परिस्थिती हाताळण्याची हातोटी सारिकाला उपयोगी पडली. तीन महिन्यांच्या हंगामी कालावधीत तिने महत्त्वाची कामे हातावेगळी केली आणि केल्सन्स इंजिनिअरिंग अँड फॅब्रिकेशन या इंटरनॅशनल कंपनीत कायम नोकरी मिळाली.

पाहता पाहता ती आपल्या कामामध्ये पारंगत झाली. तीन-साडेतीन वर्षांत चार एक्‍झिबिशन पूर्ण केली. त्यापैकी एक जर्मनीमध्ये होते. तेथेही तिने कौशल्याने कंपनीचे प्रमोशन केले. चेन्नई, दिल्ली, कोलकता येथील एक्‍झिबिशन्स सहज हाताळले. पाहता पाहता ती असिस्टंट जनरल मॅनेजर झाली. तिच्या हाताखाली आता सुमारे दीडशे कर्मचारी आहेत. कोणतेही तांत्रिक शिक्षणाची जाण नसलेली, एक तरुणी स्वतःच्या जिद्दीवर आणि येईल त्या परस्थितीशी दोन हात करत यश मिळविले. पाच हजार मासिक पगारापासून सुरू झालेली कारकीर्द पन्नास हजारांच्या पलीकडे पोचली.

माझ्यावर विश्‍वास ठेवणारे आई, वडील, नेहमी मार्गदर्शन करणारे आमच्या कंपनीचे मालक, त्यांचे प्रोत्साहन आणि हार्डवर्क करण्याची तयारी, कौशल्य यामुळेच हे यश मिळाले. मुलगी आहे म्हणून कोणीही कमी लेखू नये. तुमचे स्कील, काळानुरूप बदलण्याची तयारी, तुमचा ॲटिट्यूड, नॉलेजच हेच तुमच्या यशाचे गमक असते.  
- सारिका चव्हाण

Web Title: Industry circumference of her success flag