डिजिटल क्‍लासचा नावीन्यपूर्ण प्रयोग

डिजिटल क्‍लासचा नावीन्यपूर्ण प्रयोग

औंध - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत राज्यभर "डिजिटल' शाळा उपक्रम राबविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यातून प्रेरणा घेऊन सुतारवाडी- पाषाण येथील महापालिकेच्या वेणूताई यशवंतराव चव्हाण शाळेचे (क्र. 135 बी) शिक्षक भगवान शिरसाट यांनी क्‍यूआर कोड ओळखपत्राद्वारे सातवीचा वर्ग डिजिटल केला आहे.

प्रगतीचा आलेख ऍपद्वारे
शिरसाट यांनी सर्व विद्यार्थ्यांचे ओळखपत्र क्‍यूआर कोडचा वापर करून बनवले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन प्रकारचे कोड तयार करून दिले आहेत. मोबाईलमधील क्‍यूआर कोड स्कॅनर या ऍपवर विद्यार्थ्याच्या ओळखपत्राची एक बाजू स्कॅन केली की, त्या विद्यार्थ्याची सर्व विषयांतील प्रगती, त्याचे गुण, श्रेणी लगेचच दिसते; तर दुसरी बाजू स्कॅन केली असता विद्यार्थ्याचा "होमवर्क' बघायला मिळतो.

पालकांनाही घेतले विश्‍वासात
डिजिटल युगात सगळ्यांकडे मोबाईल आहेत. बहुतांशजण व्हॉट्‌सऍप, फेसबुक वापरत आहेत. याचाच विचार करून शिरसाट यांनी हा उपक्रम तयार केला आहे. त्या आधी त्यांनी पालकांची सभा बोलावली. यातून किती पालक मोबाईल फोन वापरतात, किती जणांच्या मोबाईलमधे इंटरनेट आहे, कोण- कोण व्हॉट्‌सऍप वापरतात हे जाणून घेतले. यात जवळजवळ सर्वच पालक मोबाईल व नेटचा वापर करत असल्याचे आढळून आले. मग शिरसाट यांनी क्‍यूआर कोड ओळखपत्राची कल्पना पालकांसमोर मांडली. तुमचा पाल्य रोज त्याचा घरचा अभ्यास तुमच्या मोबाईलमध्ये बघूनपण करू शकेल, हे पटवून दिले. पालकांनादेखील ही डिजिटल ओळखपत्राची कल्पना आवडली. त्यानंतर पालकांना मोबाईलमधे क्‍यूआर कोड स्कॅनर हे ऍप डाउनलोड करून घेऊन कसे स्कॅन करावयाचे ही माहिती दिली.

मोबाईलवर आता गेमऐवजी अभ्यास
क्‍यूआर कोडच्या साहाय्याने पालक आपल्या पाल्याची प्रगती कधीही, कुठेही पाहू शकतात. तसेच, विद्यार्थी देखील पालकांच्या मोबाईलचा वापर गेम खेळण्यासाठी न करता "होमवर्क'साठी करतील, या शिरसाट यांच्या कल्पनेला मूर्त रूप येत असून, विद्यार्थी व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शिरसाट हे त्या ऍपवर वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ, कविता, पाढे, चित्रफिती व विविध प्रकारची नवनवीन माहिती अपलोड करतात. विद्यार्थ्यांनी ओळखपत्र स्कॅन केल्यावर त्यांना ही माहिती बघून अभ्यास करता येतो. तसेच, मागचा राहिलेला अभ्यासही पाहता येतो. त्यामुळे मोबाईलवर गेम खेळणारी मुले आता अभ्यासात रमली आहेत.

शिक्षकांनाही ओळखपत्र
शाळेतील सर्व शिक्षकांची ओळखपत्रेसुद्धा क्‍यूआर कोडद्वारे बनविली आहेत, त्यावर एका बाजूला वैयक्तिक माहिती, तर दुसऱ्या बाजूला शाळेची व उपक्रमांची माहिती स्कॅन करून बघता येते.

डिजिटल शिकवणीत विद्यार्थी रममाण
महापालिकेच्या शिक्षण मंडळाने सर्व शाळांना दिलेल्या दूरदर्शन संचांचा वापर वर्गात अध्यापन करतेवेळी केला जात आहे. मोबाईलमधील व्हिडिओ, माहितिपट, चित्रे विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून दाखविली जात आहेत. शिकवत असताना प्राणी, पक्षी, नकाशे, ज्वालामुखीबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दाखविली जाते. त्यामुळे चित्रमय अभ्यासात मुले रमतात. विविध मान्यवरांची भाषणे, चॅनेलवरील थेट कार्यक्रमपण दाखवता येतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, तज्ज्ञ व उपक्रमशील शिक्षकांचे मार्गदर्शन व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्गात बसल्या- बसल्या ऐकता येईल. तसेच शिरसाट यांनी शैक्षणिक ब्लॉग बनवला असून, त्याचा उपयोग अनेक शिक्षक माहिती मिळवण्यासाठी करतात.

"शिक्षणाची वारी'साठी निवड
शिरसाट यांनी वेणूताई चव्हाण शाळेत राबविलेल्या सर्व डिजिटल उपक्रमांची औंध विभागाचे सहायक प्रशासकीय अधिकारी शिवाजी बोखारे व पर्यवेक्षिका सुनंदा पाटील यांनी दखल घेऊन त्यांचे कौतुक केले आहे. तसेच, या उपक्रमाची महापालिकेतर्फे जानेवारी 17 मध्ये भरविल्या जाणाऱ्या "शिक्षणाची वारी' यात मांडण्यासाठी निवड केली आहे. सहायक शिक्षणाधिकारी शिवाजी बोखारे यांनी औंध विभागातील सर्व शाळाप्रमुखांची बैठक बोलावून त्यांच्यासमोर या प्रयोगाचे सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून दिली.

शिकवणीसाठी दूरदर्शन संचाचा वापर
सर्व शाळांमध्ये असलेले दूरदर्शन संच मोबाईलद्वारे जोडून त्याचा वापर अध्यापनासाठी करण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकारी शिवाजी बोखारे यांनी या वेळी सर्वांना दिल्या. क्‍यूआर कोड ओळखपत्राद्वारे घरचा अभ्यास, विद्यार्थ्याची प्रगती, पाल्याने मोबाईलचा गेम खेळण्याऐवजी अभ्यासासाठी केलेला उपयोग पाहून त्यांनी शिरसाट यांचे कौतुक केले आहे.

सर्वांनी आपापल्या शाळेत डिजिटल उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने शाळा डिजिटल करण्याची गरज आहे, ज्याद्वारे मुलांना सहज, सोप्या पद्धतीने शिक्षण देता येईल. ज्यातून मुलांना गोडी निर्माण होईल. यासाठी मार्गदर्शन करण्यास मी कधीही तत्पर आहे.
- भगवान शिरसाट, तंत्रस्नेही शिक्षक

महापालिका शाळेतील शिक्षक भगवान शिरसाट यांनी राबविलेला डिजिटल उपक्रम औंध विभागातील सर्व शाळांत राबविणार आहोत. आठवडाभरात प्रत्येक शाळेतील किमान एक वर्ग डिजिटल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालक आणि विभागातील सर्वच शिक्षकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत महापालिकेच्या सर्व शाळांना याचा लाभ घेता येईल.
- शिवाजी बोखारे, सहायक शिक्षणाधिकारी, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com