वर्षभरात साडेनऊशे सापांना जीवदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

सर्प मनुष्याचा शत्रू नसून, तो आपला मित्र आहे, हे आधी सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. तसेच अनेक सर्पमित्र सापांना जीवदान देतात; पण त्यांची नोंदी करीत नाहीत. त्यांनी त्यांच्या नोंदी करून दरवर्षी वन्यजीव संस्था व वन विभागाला देण्याची गरज आहे. अजूनही वन्यजीव संस्थेशी जे सर्पमित्र जुळले नाहीत, त्यांनी संस्थेशी संपर्क करावा. 
- वासुदेव वाढे, सर्पमित्र तथा अध्यक्ष, वन्यजीव संस्था

सर्पमित्रांची कामगिरी; व्हॉटस्‌ॲप ग्रुपद्वारे जनजागृतीवर भर
जळगाव - साप म्हटला, की सर्वांगावर भीतीमुळे काटा उभा राहतो. साप चावल्यास मनुष्य मरतोच, या गैरसमजातून सापांना मारले जाते; परंतु सापांचे निसर्गातील स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या संरक्षणासाठी अलीकडे अनेक सर्पमित्र सरसावले आहेत. यात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या जिल्ह्यातील ३० सर्पमित्रांनी गेल्या वर्षभरात तब्बल ९३० विषारी, निमविषारी व बिनविषारी सापांना पकडून जंगलात सोडत जीवदान दिले आहे. 

भारतीय संस्कृतीत सर्पांना देवांचे स्थान असून, नागपंचमीला नागाची मनोभावे पूजा केली जाते; परंतु प्रत्यक्षात घरात, परिसरात आदी ठिकाणी कोणत्याही जातीचा साप आढळल्यास नागरिकांकडून त्याची हत्या केली जाते. ही स्थिती बदलण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीची आवश्‍यकता पाहता वन्यजीव संस्था त्यासाठी पुढे आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्पमित्रांकडून सर्प संरक्षण, संवर्धन केले जात आहे. त्याच अनुषंगाने सर्पमित्रांनी स्वतंत्र व्हॉटस्‌ॲप ग्रुप बनविला असून, त्या माध्यमातून सापांना वाचविण्यासाठी तसेच साप चावल्यास तो विषारी की बिनविषारी? उपचार काय करावेत? याबाबत या ग्रुपच्या माध्यमातून प्रबोधन केले जात आहे.

सर्पमित्रांची चळवळ 
सन २००८ साली जळगाव जिल्हा वन्यजीव संरक्षण संस्था सुरू झाली. जिल्ह्यात सापांना मारण्याचे प्रमाण अधिक असल्याने प्रथमतः सर्पमित्रांद्वारे सापांचे जीव वाचवून त्यांना जंगलात सुरक्षित जागी सोडण्याचे काम करण्यात येत होते. त्यानंतर सापांबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. हौशी तरुणांना सर्पाबद्दल माहिती व सर्प पकडण्याचे प्रशिक्षण देवून सर्पांचा जीव वाचवणारे सर्पमित्र तयार करण्याचे काम वन्य जीव संरक्षण समितीच्या चळवळीतून सुरू आहे. 

सापाच्या तीन हजार जाती 

शास्त्रज्ञांच्या दृष्टीने जगात सर्पांच्या तीन हजार जाती आढळतात. भारतात त्यातील ३३० सापाच्या जाती आहेत. यापैकी ६९ सापांचे प्रकार विषारी आहेत. २९ जाती समुद्रात व ४० जाती समुद्राबाहेर आढळतात. महाराष्ट्रात घोणस, नाग, मण्यार, फुरसे या चार विषारी जाती आढळतात. मात्र, त्यापेक्षा चौपट साप बिनविषारी आहेत. तसेच जिल्ह्यात ३० प्रकारचे विषारी व बिनविषारी सर्प आढळतात. त्यात विषारी नाग, मण्यार, घोणस, फुरसे, पोवळा, चापडा, निमविषारीत मांजऱ्या, अंडीखाऊ सर्प, जाड रेती सर्प, बिनविषारीत धामण, तस्कर, डुरक्‍या, कवड्या, गवत्या, अजगर यांचा समावेश होतो.

जीवदान दिलेले सर्प
जिल्ह्यातील सर्पमित्रांच्या वर्षभराच्या नोंदीत जुलै २०१६ ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत विविध जातींच्या ९५० सापांना सर्पमित्रांनी जीवनदान दिले. यात विषारी प्रजातीत नाग २३५, घोणस-मण्यार ३०, फुरसे ५, तर निमविषारी प्रजातींमध्ये अंडीखाऊ साप १, रेती साप ३, मांजऱ्या साप ५ व बिनविषारी सापांमध्ये धामण २००, पान दिवर ६०, तस्कर ७५ यासह अन्य विविध प्रजातीच्या सापांचा समावेश आहे.   

अशी साजरी करा नागपंचमी... 
जिवंत नागाऐवजी फोटो, मूर्ती अथवा पाटावर किंवा जमिनीवर नागाचे चित्र काढून पूजा करावी.
नागावर हळद-कुंकू टाकू नये, त्यामुळे त्याला इजा होऊ शकते.
नागपंचमीला नाग, सापांना दूध अथवा लाह्यांचा प्रसाद देऊ नये. 
वारूळ हे मुंग्या व वाळवीचे घर असते, त्यामुळे वारुळाची पूजा करू नये. 
सर्प मारणार नाही आणि मारू देणार नाही, अशी प्रतिज्ञा करावी.

Web Title: jalgav news 950 snake life saving in last year