त्याच्या पंखांना बळ देण्यासाठी ‘जिजाऊ’चा पुढाकार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - येथे कुलगुरू नितीन करमळकर यांच्यासमवेत जिजाऊ फाउंडेशनच्या विद्यार्थिनी आणि ज्योती ढमाळ.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - येथे कुलगुरू नितीन करमळकर यांच्यासमवेत जिजाऊ फाउंडेशनच्या विद्यार्थिनी आणि ज्योती ढमाळ.

सिंहगड रस्ता - ‘ती’ शिकावी, ‘ती’ने स्वतःच्या पायावर उभे राहावे, हा ध्यास घेऊन जिजाऊ फाउंडेशन ही संस्था जनता वसाहतीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सक्रिय पुढाकार घेत आहे. त्यातून अनेक मुली आज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्या आहेत.  खऱ्या अर्थाने गोरगरीब मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम ही संस्था करीत आहे. 

जनता वसाहत भागातील मुलींना बऱ्याचदा विविध कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. इच्छा असली, तरी त्यांना शिक्षण घेता येते नाही. त्यामुळे शिक्षणाअभावी या मुलींना सामाजिक, आर्थिक, फसवणूक यांसारख्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या परिसरात शिक्षणासाठी पूरक वातावरण नसल्याने मुलींना शिक्षणासाठी उद्युक्त करण्याचे प्रयत्न ही संस्था करीत आहे.

संस्थेच्या अध्यक्षा ज्योती ढमाळ व  जितेंद्र ढमाळ यांनी  हा उपक्रम सुरू केला. वस्ती पातळीवर अंबिका कांबळे आणि उमाकांता कांबळे काम पाहतात. संस्थेतर्फे या भागातील पाचवी ते दहावीतील वीस मुलींना दत्तक घेण्यात आले आहे. मुलींची शैक्षणिक जबाबदारी संस्थेने घेतली आहे. अनाथ व एकच पालक असलेल्या मुलींसाठी ही संस्था कार्यरत आहे. शैक्षणिक साहित्य देणे, फी भरणे, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य सध्या सुरू आहे. या परिसरात तरुणींसोबत छेडछाडीच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे मुली शाळेत जाण्यास टाळाटाळ करीत होत्या. मात्र, संस्थेने पोलिसांच्या सहकार्याने या मुलींना होणारा त्रास कमी केला.

जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला शैक्षणिक मदत मिळते. तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळते.  त्यांच्यामुळेच आम्ही शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची सपत्नीक भेट घेतली. विज्ञान क्षेत्रात संशोधनाचे मोठे विश्‍वच त्यांनी आमच्या समोर उलगडून ठेवले. 
- अमृता कांबळे, विद्यार्थिनी, रेणुका स्वरूप

जनता वसाहतीमध्ये मुलींना शिक्षणासाठी पूरक परिस्थिती नसल्याने शिक्षण घेता येत नाही.  त्यांना शिकता यावे, यासाठी आम्ही प्रयत्न  करीत आहोत.  
- ज्योती ढमाळ, अध्यक्षा, जिजाऊ फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com