कातकरी जळीतग्रस्तांसाठी धावली माणुसकी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

अचानक लागलेल्या आगीतून हातावर पोट असलेल्या कातकरी लोकांच्या दहा झोपड्या बेचिराख झाल्या. धान्यासह संसारोपयोगी साहित्य खाक झाले. अशा संकटसमयी माणुसकी त्यांच्या मदतीला धावली. युवकांनी पुढाकार घेत दहा पोती धान्य व संसारोपयोगी साहित्य या कुटुंबांसाठी जमा केले.

नागठाणे - अचानक लागलेल्या आगीतून हातावर पोट असलेल्या कातकरी लोकांच्या दहा झोपड्या बेचिराख झाल्या. धान्यासह संसारोपयोगी साहित्य खाक झाले. अशा संकटसमयी माणुसकी त्यांच्या मदतीला धावली. युवकांनी पुढाकार घेत दहा पोती धान्य व संसारोपयोगी साहित्य या कुटुंबांसाठी जमा केले.

शेंद्रे (ता. सातारा) येथे महामार्गालगत असलेल्या डोंगर परिसरात कातकरी वस्ती आहे. १२ कुटुंबे इथे वास्तव्यास असतात. उरमोडी नदीवर मासे- खेकडे पकडून विकण्याचा त्यांचा व्यवसाय. हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन. गेल्या आठवड्यात स्वयंपाक करताना विस्तव पडून एका झोपडीस आग लागली. त्यातून १२ झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. सगळे संसारोपयोगी साहित्य त्यात बेचिराख झाले. सारी कुटुंबे उघड्यावर पडली.

त्यांना सावरण्यासाठी शेंद्रेतील ‘आसिफभाई फ्रेंड सर्कल’ समूहातील युवकांनी पुढाकार घेतला. आसिफ सय्यद, रसिक पटेल, प्रवीण शहा, मिलिंद जाधव, हर्षल गुजर, यासिन मुलाणी आदींनी या कातकरी कुटुंबासाठी दहा पोती धान्य जमा करून संजय पोतेकर, धनाजी पोतेकर, संभाजी मोहिते आदींच्या उपस्थितीत कातकरी कुटुंबांना हे धान्य सुपूर्द करण्यात आले. अजिंक्‍य तरुण व्यायाम मंडळातर्फे अस्लम मुलाणी, यशवंत जाधव, विजय पोतेकर, अमर मोरे, श्रीमंत पोतेकर, किरण जाधव, सचिन पाटील, संतोष पडवळ, ग्रामसेवक जी. बी. माने आदींनी या कुटुंबीयांना लागणारे सर्व प्रापंचिक साहित्य, कपडे, भांडी आदींची मदत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Katkari Society Fire Affected Family Youth Help Humanity Initiative